नूपुर शर्मा यांनी काय चुकीचे विधान केले, हे मौलवी यांनी सांगावे !  

इस्लामी विचारवंत अतीकुर रहमान यांचे आवाहन

नूपुर शर्मा आणि अतीकुर रहमान

मुंबई – नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयीचे केलेले विधान चुकीचे नव्हते. जर कुणाला वाटते की, नूपुर शर्मा यांनी चुकीचे विधान केले, तर एखाद्या ज्येष्ठ मौलवीने समोर येऊन ‘शर्मा यांनी काय चुकीचे विधान केले ?’ हे सांगितले पाहिजे, असे स्पष्ट मत इस्लामी विचारवंत अतीकुर रहमान यांनी ‘इंडिया न्यूज’ या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात मांडले. रहमान यांनी सामाजिक माध्यमांतून या संदर्भात प्रसारित होणारा द्वेष आणि धमकी यांविषयी खंत व्यक्त केली, असे वृत्त ‘ऑपइंडिया’ वृत्तसंकेतस्थळाने प्रकाशित केले आहे. या चर्चासत्रात विश्‍व हिंदु परिषदेचे नेते विनोद बंसल हेही सहभागी झाले होते.

नूपुर शर्मा यांनी काय चुकीचे म्हटले, ते स्पष्ट करावे ! – विनोद बंसल, विहिंप

या वेळी विनोद बंसल म्हणाले की, मी अतीकुर रहमान यांच्या त्या विधानाचे समर्थन करतो, ज्यात त्यांनी ‘महंमद पैगंबर यांच्या जीवनावर चर्चा झाली पाहिजे’, असे म्हटले आहे; कारण पैगंबर यांच्या जीवनातून शिकण्याची आवश्यकता आहे. भारत असा देश आहे, जेथे भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या जीवनावरही चर्चा होते. त्यातून प्रेरणा घेतली जाते. अशा वेळी आपण पैगंबर यांच्याकडून का शिकू नये ? नूपुर शर्मा यांनी जे काही म्हटले आहे, ते इस्लामी पुस्तकांच्या संदर्भाने म्हटले आहे आणि तेच काही इस्लामी विद्वानांनीही म्हटले आहे. यामुळे मी अतीकुर रहमान यांना विचारू इच्छितो की, शर्मा यांच्या विधानात काय चुकीचे होते ? त्यांनी म्हटले ते चुकीचे होते ? किंवा त्यांची शैली आणि वागणे चुकीचे होते ? इस्लामी पुस्तकांमध्ये लिहिले आहे ते चुकीचे आहे ? मग इस्लामवादी त्यांचा शिरच्छेद करण्याची मागणी का करत आहेत ?

नूपुर शर्मा यांना क्षमा केली जाऊ शकते ! – अतीकुर रहमान

यावर उत्तर देतांना रहमान म्हणाले की, मी तुम्हाला सांगू इच्छितो की, नूपुर शर्मा चुकीच्या नाहीत. जर एखादा इस्लामी विद्वान अथवा मुसलमान असा विचार करतो की, शर्मा चुकीच्या आहेत, तर इस्लामचा परिघ इतका व्यापक आहे की, शर्मा यांना क्षमा केली जाऊ शकते. एखाद्या वरिष्ठ मौलवीने ‘नूपुर शर्मा यांनी कुठे चूक केली ?’, हे सांगावे.

अतीकुर रहमान पुढे म्हणाले की, जर मी नूपुर शर्मा यांना चर्चासत्रात बोलावून त्यांची चुकीची माहिती दुरूस्त करू शकत नसेल, तर मला इस्लामचा पाईक म्हणून चर्चासत्रात सहभागी होण्याचा अधिकार नाही. मी इस्लाम आणि महंमद पैगंबर यांच्या विरोधात विधान करणार्‍यांना आमंत्रित करतो. यामुळे मला जगाला ‘पैगंबर यांचा संदेश काय होता ?’, हे सांगण्याची संधी मिळेल, तसेच ‘जगामध्ये संदेश पसरवण्यासाठी अल्लाने महंमद पैगंबर यांची निवड कशी केली ?’, हेही सांगता येईल.