पक्षाच्या घटनेत हिंदुत्वाचा उल्लेख नसल्यावरून काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी भाजप आणि शिवसेना यांना हिणवले !

सचिन सावंत

मुंबई, ७ जुलै (वार्ता.) – ‘म्हणे हिंदुत्वनिष्ठ सरकार स्थापन केले. पक्षाची घटना पहाण्याची तसदी घ्याल का ?’ असे ट्वीट करून पक्षाच्या घटनेत हिंदुत्वाचा उल्लेख नसल्यावरून काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप अन् शिवसेना यांना हिणवले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधानसभेत, तसेच प्रसिद्धीमाध्यमांपुढे आमचे सरकार हिंदुत्वाच्या विचाराने चालणार असल्याचे आवर्जून नमूद केले आहे. यावरून सचिन सावंत यांनी भाजप आणि शिवसेना यांना हिणवले आहे.

या ट्वीटमध्ये सचिन सावंत यांनी भाजप आणि शिवसेना या पक्षांच्या घटनेतील कागदपत्रेही ‘रि ट्वीट’ केली आहेत. यामध्ये भाजप पक्षाच्या घटनेत ‘मी धर्मनिरपेक्ष राज्य आणि कोणत्याही धर्मावर आधारित नसणारे राष्ट्र या संकल्पनांचा स्वीकार करतो’, असा उल्लेख आहे. यावरून सचिन सावंत यांनी भाजप हा अत्यंत दांभिक आणि दुतोंडी पक्ष आहे. यांच्या पक्ष घटनेत ‘हिंदुत्व’ हा शब्दही नाही. आधी त्यांनी पक्षघटना पालटून दाखवावी, असे म्हटले आहे. शिवसेना पक्षाच्या घटनेत ‘पक्ष राष्ट्रीय धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि राष्ट्रीय एकात्मता या तत्त्वांना बांधील असेल’, असे नमूद केले आहे.

संपादकीय भूमिका

काँग्रेसने जन्माला घातलेली तथाकथित धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव यांचा त्याग करून हिंदुत्वाचा पुरस्कार केल्यास हिंदुत्वनिष्ठ पक्षांना हिणवणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांची तोंडे आपोआप बंद होतील !