अमेरिकन महिला काळ्या बाजारातून गर्भपाताच्या गोळ्या मिळवण्याची शक्यता !

रियो दी जॅनेरिओ (ब्राझिल) – अमेरिकेत गर्भपात करण्यावर नुकतीच बंदी घालण्यात आल्याने तेथे ब्राझिलसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्राझिलमध्ये गर्भपातबंदी लागू झाल्यानंतर त्याच्या गोळ्यांवरही बंदी आली; परंतु या गोळ्यांची विक्री काळ्या बाजारात सर्रास होऊ लागली. त्यामुळे गरजू महिला, विशेषत: किशोरवयीन मुली डॉक्टरांचा सल्ला न घेता थेट औषधांच्या दलालांकडून अशा गोळ्या खरेदी करू लागल्या. हीच परिस्थिती अमेरिकेत निर्माण होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

वास्तविक ब्राझिलमध्ये वर्ष १८९० पासून गर्भपात करण्यास बंदी आहे; परंतु वर्ष १९४० मध्ये या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार अत्याचार पीडित महिला त्यास अपवाद असतील. अशा स्थितीत ब्राझिलच्या महिलांनी गर्भपाताची सोपी पद्धत शोधून काढली. त्या मासिक पाळीस विलंब झाल्यानंतर घेण्यात येणार्‍या गोळ्या गर्भपातासाठी घेऊ लागल्या. ब्राझिलमध्ये गर्भपातासाठी तीन वर्षांच्या कारागृहाची शिक्षा आहे.

भारत, मेक्सिको आणि अर्जेंटिना येथून गोळ्यांचा काळाबाजार !

गर्भपातावर बंदी असलेल्या देशांमध्ये गर्भपाताच्या गोळ्या काळ्या बाजारात महागड्या दरात विकल्या जातात. भारत, मेक्सिको आणि अर्जेंटिना येथून येणार्‍या गोळ्यांसाठी १५ सहस्र ते ३० सहस्र रुपये मोजले जातात. गर्भपातावरील बंदीपूर्वी अमेरिकेत ६० गोळ्यांचे पाकीट १५ डॉलर, म्हणजे १ सहस्र १०० रुपयांना विकले जात होते.

संपादकीय भूमिका

  • अमेरिकेत गर्भपातावर बंदी आल्यामुळे स्वैराचारावर लगाम बसेल, असे सांगितले जात होते; परंतु आता काळ्या बाजारातून गर्भपाताच्या गोळ्या मिळवल्या जात असल्याने अमेरिकेत स्वैराचार ही किती बोकाळला आहे, हे लक्षात येते !
  • केवळ कठोर कायदे करून नव्हे, तर समाजात नीतीमत्तेची शिकवण देणारी शिक्षणव्यवस्था निर्माण झाल्यावरच स्वैराचार रोखता येईल. यासाठी राजसत्तेचे अध्यात्मीकरण होणे अत्यावश्यक आहे ! अर्थात् अमेरिकेसारख्या पाश्‍चात्त्य देशाला यासाठी हिंदु धर्माचे आचरण करावे लागेल !