फ्रान्समध्ये प्रत्येक चार जणांपैकी एकजण बहिरा ! – संशोधनाचा निष्कर्ष

‘हेडफोन्स’ आणि ‘इअरफोन्स’चा अधिक वापर केल्याचा दुष्परिणाम !

पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्समध्ये नुकतेच १८ ते ७५ वर्षे वयोगटांतील २ लाख लोकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणात ‘फ्रान्समध्ये चार जणांपैकी एकजण बहिरा आहे किंवा त्याला अल्प प्रमाणात ऐकायला येते’, असे दिसून आले. लोकांची ऐकण्याची क्षमता अल्प होण्यामागे अनेक घटक कारणीभूत असले, तरीही त्यात सर्वांत मोठा वाटा ‘हेडफोन्स’ आणि ‘इअरफोन्स’ यांचा आहे, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.

१. तज्ञांनी म्हटले की, सर्वसाधारणपणे देशातील २५ टक्के लोकांना जर ऐकू न येण्याचा त्रास असेल, तसेच त्यांना क्षमतेपेक्षा अल्प ऐकू येत असेल, तर ती अतिशय गंभीर गोष्ट आहे.

२. फ्रान्समध्ये साधारणपणे ४० टक्के लोक ‘इअरफोन्स’ वापरतात. तरीही अल्प ऐकू येणार्‍या लोकांची संख्या फार मोठी आहे. याची इतरही अनेक कारणे आहेत. जे लोक ‘इअरफोन्स’ वापरतात, त्यांच्यापैकी जवळपास ९० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांची ऐकू येण्याची क्षमता अल्प झाली आहे. त्यामुळे फ्रान्स सरकार ‘इअरफोन्स’सारख्या उपकरणांचा वापर न्यून व्हावा, यासाठी जनजागृती करणार आहे.

३. फ्रान्समध्ये अनेक सार्वजनिक ठिकाणी लोकांना विनामूल्य ‘इअरफोन्स’ वाटले जातात. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे सरकारी खात्याकडूनच लोकांना विनामूल्य ‘इअरफोन्स’ वाटले जात असल्याने लोकांनी आता सरकारलाही धारेवर धरले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेची चेतावणी

या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, आणखी केवळ २५ वर्षांत जगात बहिर्‍यांची संख्या दीड कोटी इतकी प्रचंड असेल. त्यामुळे लोकांनी या दीड कोटींमध्ये ते असणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

तीव्र आवाजामुळे होणारे दुष्परिणाम !

कोणताही आवाज ऐकण्याची आपल्या कानांची क्षमता ९० डेसिबलपर्यंत असते; पण सतत आणि अगदी जवळून काही आवाज कानावर आदळत राहिले, तर आपली ऐकण्याची क्षमता अल्प होऊन ४० ते ५० डेसिबलपर्यंत जाते आणि नंतर जवळपास बहिरेपणाच येतो. आपले कान बधिर होतात. इतकेच नव्हे, तर सतत तीव्र आवाज कानांवर पडला, तर हृदयविकार होऊ शकतो, तसेच कर्करोगासारख्या आजारांनाही सामोरे जावे लागू शकते. ‘इअरफोन’वर अधिक काळ गाणी ऐकण अणि वेगवेगळे कार्यक्रम पहाणे किंवा ऐकणे यांमुळे कानात संसर्ग होऊ शकतो, तसेच मेंदूला हानी पोचू शकते. यासह ते मानसिक आजारांना आमंत्रण ठरू शकते. डोकेदुखी मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि निद्रानाशाचाही विकार जडू शकतो.