रामनाथी (गोवा) – मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी अद्याप पुष्कळ कार्य करायचे आहे. मंदिरे ही चैतन्याचे स्रोत आहेत. आज मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांना विरोध म्हणून का होईना; पण मंदिरांमध्ये हनुमान चालिसाचे पठण होऊ लागले आहे. अनेक मंदिरांमध्ये महाआरती होत आहे. आता आपण मंदिरे ही सामूहिक उपासना केंद्रे बनण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करायला हवा. मंदिरे ही उपासनेची केंद्रे झाली, तर त्या माध्यमातूनच समाजाचे आध्यात्मिक बळही वाढेल. मंदिरे टिकली, तरच धर्म टिकेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी केले. त्यांनी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी आयोजित केलेल्या दुसऱ्या सत्रात ‘मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांना संघटित करणे’, या विषयावर अनुभवकथन केले.