पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – आषाढी यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीवरील नवीन पुलासमवेतच जुन्या दगडी पुलाचाही वारकरी भाविकांकडून पायी येण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. सध्या जुन्या दगडी पुलावर खड्डे पडले असून संरक्षक कठडे नसल्याने पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्ग, पालखी तळ, चंद्रभागा नदीपात्र, प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर आदींची पहाणी शंभरकर यांनी केली. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी गजानन गुरव, तसेच संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.