सातारा, २५ जून (वार्ता.) – केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमानुसार एकल उपयोगाच्या (सिंगल यूज) प्लास्टिक वस्तूंना प्रतिबंध केला आहे. १ जुलै २०२२ पासून याची जिल्ह्यात कडक कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले. एकल उपयोग प्लास्टिक बंदीसाठीच्या जिल्हास्तरीय कृतीदलाची बैठक जिल्हाधिकारी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘नियोजन भवन’ येथे पार पडली. या वेळी ते बोलत होते.
या वेळी शेखर सिंह पुढे म्हणाले की, प्लास्टिक कचर्याचे विलगीकरण, संकलन, साठवण, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट यांसाठी असणारी यंत्रणा अधिक सक्षम करावी. सविस्तर कृती आराखड्यासह शैक्षणिक संस्था, एन्.सी.सी., एन्.एस्.एस्., स्काऊट्स, युवा क्लब, इको क्लब आणि स्वयंसेवी संस्थांचा समावेश करून प्लास्टिक प्रदूषण अल्प करण्यासाठी एक भक्कम सार्वजनिक चळवळ उभी करावी. बंदी घातलेल्या एकल उपयोग प्लास्टिक वस्तूंचा उपयोग करण्यास परावृत्त करावे. तसेच पर्यायांच्या उपयोगास प्रोत्साहन देण्यासाठी दुकानदार आणि बाजार संघटनांसोबत बैठक घ्यावी. जिल्ह्यातील ग्रामपंचायती सुका आणि ओला कचरा यांवर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने लवकरच ग्रामपंचायतींच्या कार्यशाळा घेण्यात याव्यात.