सोलापूर, २३ जून (वार्ता.) – आषाढी वारीसाठी विविध जिल्हे, तसेच अन्य राज्ये येथून लाखो भाविक पंढरपूर येथे येतात. चालतांना वारकऱ्यांचा पाय खड्ड्यात पडून काही दुर्घटना होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणेने प्रयत्न करावेत. शहरातील नगर प्रदक्षिणा मार्ग, महाद्वार घाट ते घाट चौक, नामदेव पायरी यांसह शहरातील रस्त्यांवर असणारे खड्डे बुजवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले. (असे निर्देश का द्यावे लागतात ? – संपादक)
नियोजन भवन येथे आषाढी वारी नियोजनाविषयी संबंधित विभागाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आरोग्य विभागाने पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य केंद्रे चालू ठेवावीत. त्याच ठिकाणी वारकऱ्यांसाठी कोरोना पडताळणी करण्याची सोय करावी. वारी मार्गावरील प्रत्येक तालुक्यात एक विलगीकरण केंद्र सिद्ध ठेवावे, तसेच वारकऱ्यांच्या लसीकरणासाठीही व्यवस्था करावी, अशा सूचना या वेळी शंभरकर यांनी दिल्या.