पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान चीनला देण्याच्या सिद्धतेत !

कर्ज फेडण्यासाठी कंगाल पाक घेऊ शकतो निर्णय

इस्लामाबाद (पाकिस्तान) – देशावरील वाढते कर्ज फेडण्यासाठी पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान हा भाग चीनला भाडेपट्ट्यावर देण्याची शक्यता आहे, असे ‘काराकोरम नॅशनल मूव्हमेंट’चे अध्यक्ष मुमताज यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेश भविष्यात युद्धाचे मैदान बनू शकतो. जर पाकिस्तानने चीनला गिलगिट-बाल्टिस्तान दिले, तर चीनकडून पाकला अधिक मोठे साहाय्य मिळू शकते; मात्र हे पाऊल पाकला महागात पडू शकते; कारण चीनचा प्रभाव वाढेल, अशी कोणतीही गोष्ट अमेरिका होऊ देणार नाही. अमेरिका भविष्यात जागतिक बँक, जागतिक नाणेनिधी आणि अन्य जागतिक संघटना यांच्याद्वारे पाकला काळ्या सूचीमध्ये टाकू शकतो.

गिलगिट-बाल्टिस्तानची स्थिती दयनीय  

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार गिलगिट-बाल्टिस्तानच्या लोकसंख्येत घट होत आहे. सक्षम लोक तेथून पलायन करत आहेत. संपूर्ण पाकिस्तानात जितक्या आत्महत्या होतात, त्यांपैकी ९ टक्के आत्महत्या गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये होत आहेत. येथे केवळ २ घंटेच वीज उपलब्ध असते. यासह अन्य सुविधांचाही येथे अभाव आहे.

संपादकीय भूमिका

असे झाल्यास भारताला चीनपासून आधीच असलेला धोका आणखी वाढेल. अशा कुरापतखोर पाकला भारत कसा धडा शिकवणार आहे ?