साहित्यिक उदय भेंब्रे यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्याचा ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या वतीने निषेध

डिचोली (गोवा), २१ जून (वार्ता.) – कोकणी साहित्यिक उदय भेंब्रे यांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे गोव्यासाठी काहीच कार्य नाही’, या वक्तव्याचा ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या वतीने डिचोली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आलेल्या एका सभेतून निषेध करण्यात आला.

याप्रसंगी ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे सुबोध मोने म्हणाले, ‘‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे आराध्य दैवत आहे. त्यांच्याविषयी कुणीही चुकीची वक्तव्ये करून युवा पिढीचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करू नये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलतांना प्रथम त्यांचाबद्दलचा पूर्ण इतिहास जाणून घ्यावा.’’ या वेळी शांतीसागर हेवाळे, उदय जांभेकर, मंदार गावडे आदी शिवप्रेमींची उपस्थिती होती.

कोकणी साहित्यिक उदय भेंब्रे

कोकणी साहित्यिक उदय भेंब्रे सामाजिक माध्यमात म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आम्हाला आदर आहे; मात्र त्यांनी किंवा धर्मवीर संभाजी महाराज यांनी गोव्यावर राज्य केल्याच्या दाव्यात तथ्य नाही. याला कसलाही ऐतिहासिक पुरावा नाही. गोव्यात ज्या वेळी बाटाबाटी चालू होती, त्या वेळी महाराष्ट्रात शिवरायांचे राज्य होते, तरीही त्यांनी गोव्यात येऊन पोर्तुगिजांना बाहेर घालवण्यासाठी आक्रमण केले नाही. (छत्रपती शिवरायांचे ५२ व्या वर्षी निधन झाले. वयाच्या सोळाव्या वर्षापासून ते हिंदूंना पाच पातशाह्यांपासून मुक्त करण्यासाठी लढले. त्यातही त्यांनी २ वेळा पोर्तुगिजांना गोव्यातून हाकलण्यासाठी प्रयत्न केले. तरीही त्यांचे महाराष्ट्रात राज्य असतांना त्यांनी पोर्तुगिजांना घालवण्यासाठी आक्रमण केले नाही, असे म्हणणे कितपत योग्य ? भारत स्वतंत्र झाल्यावर नेहरूंनी हाताशी सैन्य असूनही १४ वर्षे काही केले नाही. त्यांना दोष देणे योग्य आहे ! – संपादक) उलट सिद्धीशी लढण्यासाठी आरमार बांधणीसाठी पोर्तुगीज कारागिरांचे साहाय्य घेतले. पांडुरंग पिसुर्लेकर लिखित ‘मराठे पोर्तुगीज संबंध’ या पुस्तकात असा उल्लेख आहे.

छत्रपती शिवाजी आणि गोवा यांचा संबंध पोर्तुगिजांकडील कागदपत्रांवरून सिद्ध होईल ! – सुभाष फळदेसाई, मंत्री, पुरातत्व आणि पुराभिलेख खाते

पोर्तुगीज प्रशासकांनी लिहिलेल्या पत्रांतून छत्रपती शिवाजी आणि गोवा यांचा संबंध उजेडात येईल, असे प्रतिपादन पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले आहे. पोर्तुगालमधील कागदपत्रे गोव्यासाठी पुष्कळ महत्त्वाची आहेत. तेथे मालमत्तेशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे सापडतील. सांगे येथील सोशियादादच्या लाखो चौरसमीटरच्या भूमीची कागदपत्रे मिळाल्यास ही भूमी गोवा सरकारला मिळेल.