धर्मप्रचारासाठी देशभर प्रवास करतांना अनेक साधक भेटले. यांपैकी चांगली क्षमता असूनही अनेक साधकांचे व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न होतांना आढळले नाहीत. या संदर्भात साधकांशी संवाद करतांना लक्षात आले की, बहुतांश साधक साधनेतील अडचणी किंवा साधना करण्याच्या संदर्भात येणाऱ्या कौटुंबिक-आर्थिक-व्यावहारिक अडचणी यांमुळे कुठे तरी थांबलेले आहेत. साधनेतील मार्गदर्शक संतांशी स्वतःच्या साधनेविषयी किंवा साधनेतील अडचणींविषयी मोकळेपणाने न बोलणे, ही त्यांची प्रमुख अडचण होती. आपली साधना ही गुरुकृपायोगानुसार असल्याने साधनेमध्ये गुरुरूपातील संतांच्या मार्गदर्शनाला किंवा त्यांनी दिलेल्या साधनेच्या दिशेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने बोलण्याचे महत्त्व आहे. या संदर्भात काही सूत्रे पुढे दिली आहेत.
१. साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने बोलणे म्हणजे काय ?
मनात जो साधनेच्या संदर्भात विचार असतो, जे द्वंद्व असते, जो दृष्टीकोन असतो, जो भाव असतो, जी अडचण असते, जी शंका असते किंवा जी सूचना असते, ती जशी आहे, तशी (As it is) सांगणे.
यात विचार, प्रश्न, सूचना किंवा दृष्टीकोन योग्य किंवा अयोग्य दोन्ही असला, तरी ते सांगणे महत्त्वाचे असते; कारण ते सांगितल्यानंतरच ते साधनेच्या दृष्टीने योग्य कि अयोग्य आहे ? हे समजून घेता येते.
२. साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने बोलण्याची आचारसंहिता
अ. साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने बोलतांना जिज्ञासा हवी.
आ. साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने बोलणे, म्हणजे मनातील सूत्रे आग्रहीपणे मांडणे नव्हे.
इ. साधनेच्या संदर्भात योग्य दृष्टीकोन देण्याची क्षमता असलेल्या साधकाकडे साधनेच्या संदर्भात मनमोकळणाने बोलणे अपेक्षित असते, उदाहरणार्थ – मार्गदर्शक संत, उन्नत साधक, उत्तरदायी साधक, व्यष्टी आढावा घेणारा साधक, आध्यात्मिक मित्र, समष्टी साधनेतील सहसाधक इत्यादी. थोडक्यात अन्य साधक, नातेवाईक यांच्याशी साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने बोलू नये. याचे कारण त्यांना साधनेचा योग्य दृष्टीकोन नसतो.
ई. साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने बोलणे, हा पैलू स्वतःच्या व्यष्टी साधनेच्या संदर्भात आहे.
३. साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने बोलण्याने होणारे लाभ
३ अ. मनावरील तणाव घटणे : बऱ्याचदा काही विचारांमुळे किंवा अडचणींमुळे मनावर तणाव निर्माण झालेला असतो. त्याविषयी मनमोकळेपणाने योग्य व्यक्तीशी बोलल्याने उपाय मिळतात आणि तणाव न्यून होतो.
साधकांच्या मनावरील तणावाचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते की, एकाच प्रसंगाच्या संदर्भात साधकाच्या मनावर दोन-तीन प्रकारचे तणाव असू शकतात. त्यामुळे एखाद्या तणावाचे निर्मूलन झाले, तरी अन्य दोन तणावांमुळे त्याची स्थिती तणावयुक्त असते. अशा वेळी मनमोकळेपणाने तणावाचे सर्व पैलू सांगितल्याने त्याचा लाभ होतो.
३ आ. साधनेतील अडचणींवरील उपायांसाठी दिशा मिळणे : साधनेतील अडचणी किंवा साधना करण्याच्या संदर्भात येणाऱ्या कौटुंबिक-आर्थिक-व्यावहारिक अडचणी, यांविषयी दिशा मिळाल्याने त्याविषयी प्रयत्न होऊ लागतात. परिणामी पुढे चांगली साधना होऊ लागते.
३ इ. आत्मविश्वास वाढतो : काही वेळा मनात साधनेचा दृष्टीकोन किंवा समष्टीतील धोरण, यांविषयी द्वंद असते. त्यामुळे ती कृती करण्याविषयी आत्मविश्वास अल्प असतो. याविषयी मनमोकळेपणाने बोलल्याने द्वंद्वातून एका विचाराकडे जाण्याची दिशा मिळून आत्मविश्वास वाढतो.
३ ई. शंकानिरसन होणे : शंका असणे, ही स्वाभाविक गोष्ट असली, तरी तिचे वेळीच निरसन केले नाही, तर ती पुढे विकल्पात रूपांतरित होण्याचा धोका असतो. यासाठी वेळोवेळी व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात निर्माण झालेल्या शंका मनमोकळेपणाने विचारून त्यांचे निरसन करू घेणे आवश्यक असते.
३ उ. सुस्पष्टता येणे : समष्टी साधनेमध्ये अनेकदा संवाद सुस्पष्ट न झाल्याने अडचणी उत्पन्न होतात. जेव्हा या अडचणींविषयी साधक मनमोकळेपणाने बोलतो, तेव्हा त्याला विषयाची सुस्पष्टता येते आणि अडचणी दूर होतात.
३ ऊ. मतभेद दूर होणे : काही वेळा समष्टी साधनेमध्ये उत्तरदायी सहसाधकांमध्ये काही विषयांच्या संदर्भात मतभेद जाणवतात. दोन्ही साधकांचा हेतू शुद्ध असतो, म्हणजे साधनेचा आणि समष्टीहिताचा असतो; परंतु त्यांच्या चिंतनाचे पैलू भिन्न असतात. जेव्हा सहसाधक एकमेकांशी सेवेच्या संदर्भातील मतभेदांविषयी मोकळेपणाने बोलू लागतात, तेव्हा मतभेद दूर होऊन मने जुळण्याची प्रक्रिया चालू होऊ लागते. या प्रक्रियेमुळे पूर्वग्रह दूर होतात.
३ ए. साधनेचे योग्य दृष्टीकोन मिळणे : साधनेच्या सिद्धांतानुसार विशिष्ट परिस्थितीत व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या दृष्टीने साधनेचे दृष्टीकोन भिन्न असतात. त्यामुळे अशा विशिष्ट परिस्थितीत साधनेविषयी योग्य दृष्टीकोन काय ठेवायला हवा, हे कळते.
३ ऐ. साधनेची फलनिष्पत्ती वाढणे : मनातील द्वंद्व, शंका आणि अडचणी यांचे निरसन झाल्यामुळे साधना चांगली होऊन साधनेची फलनिष्पत्ती वाढू लागते. मन मोकळे करण्याची सवय लागल्याने उत्साह वाढून आनंदी रहाता येते.
३ ओ. साधनेतील निर्णय घेता येणे : काही वर्षे साधना केल्यानंतर काही साधकांच्या मनात पूर्णवेळ साधना करण्याच्या संदर्भात विचार येऊ लागतात. नोकरी-व्यवसायातून किंवा कुटुंबकर्तव्यातून निवृत्त झाल्यानंतर साधकांच्या मनात ‘आश्रमात राहून पुढील साधना करावी’, असा विचार येतो; परंतु याविषयी उत्तरदायी साधकांशी मनमोकळेपणाने न बोलल्याने ते आहे, त्या स्थितीत रहातात. साधनेतील निर्णय घेण्यासाठी मनमोकळेपणा अतिशय आवश्यक असतो.
४. मनमोकळेपणाने न बोलण्याची कारणे
मनमोकळेपणाने न बोलण्याची कारणे काय आहेत, हे आता आपण समजून घेऊया.
४ अ. स्वभावदोष : मनमोकळेपणाने न बोलण्यामागे ‘स्वभावदोष’ हा महत्त्वाचा घटक असतो. बऱ्याचदा अलिप्त स्वभावाच्या व्यक्ती मनमोकळेपणाने बोलत नाहीत. भिडस्तपणा, प्रतिमा जपणे आणि आत्मविश्वास अल्प असणे इत्यादी दोषांमुळेही मनमोकळेपणाने बोलले जात नाही.
४ आ. अडचणींवरील उपायांच्या संदर्भात अपेक्षा असणे : मनमोकळेपणाने न बोलण्यामागे अपेक्षा ठेवणे, हाही दोष काही प्रमाणात कारणीभूत असतो. विशेषतः साधनेच्या संदर्भात किंवा समष्टी कार्यातील अडचणी मांडतांना ‘त्या अडचणींवर स्वतःला अपेक्षित अशी दिशा मिळावी, ही अपेक्षा मनात असल्याने आणि ती अपेक्षा पूर्ण होणार नाही’, असा विचार प्रबळ असल्याने साधक त्या अडचणींविषयी मोकळेपणाने बोलत नाहीत. हे अनेक ठिकाणी दिसून आले आहे.
५. साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने न बोलल्याने होणारी हानी
अ. निराशा येणे
आ. निरुत्साह वाढणे
इ. साधनेतील अडचणी न सुटणे
ई. विकल्प येणे
उ. साधनेची फलनिष्पत्ती घटणे
या सर्व कारणांमुळे साधनेमध्ये उन्नती होत नाही किंवा एक प्रकारे अधोगती होते.
६. साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने न बोलण्याचे घातक पैलू
६ अ. संत आणि गुरु यांच्याशी मनमोकळेपणाने न बोलणे : साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी सनातन संस्थेचे समष्टी संत उपलब्ध आहेत. अनेक ठिकाणी लक्षात आले की, उत्तरदायी साधक साधनेतील अडचणी-अडथळे यांच्या संदर्भात संतांशी मनमोकळेपणाने बोलत नाहीत. हा साधनेतील सर्वांत मोठा अडथळा आहे. खरे तर ज्या साधकाला शिष्य बनायचे आहे किंवा आध्यात्मिक उन्नती करायची आहे, त्याने साधनेतील अडचणींविषयी संतांशी वेळोवेळी मोकळेपणाने बोलायलाच हवे. ज्यांच्याकडून आपण साधना शिकतो, त्यांच्याशीच मनमोकळेपणाने न बोलल्याने साधकाला साधनेची दिशा मिळत नाही आणि दिशाच मिळाली नाही, तर साधनेत उन्नती कशी होणार ?
अनेक उत्तरदायी साधकांच्या मनात ‘आपल्या अडचणींसाठी संतांचा वेळ वाया जाऊ नये’, असा विचार प्रबळ असतो. संतांप्रतीचा हा भाव एक प्रकारे योग्य असला, तरी साधनेच्या संदर्भात घातक ठरणारा असतो. तसेच असा विचार करणे, म्हणजे साधनेत आहे, त्या स्थितीत रहाण्याची अल्पसंतुष्टता असण्यासारखे आहे. ज्याला आध्यात्मिक उन्नतीचा किवा समष्टी साधनेचा ध्यास लागलेला आहे, त्या साधकाने असा विचार कदापि करू नये.
६ आ. व्यष्टी साधनेचा आढावा देतांना मनमोकळेपणा नसणे : ही अनेक साधकांच्या संदर्भात होणारी सर्वसामान्य चूक आहे. व्यष्टी साधनेचा आढावा देतांना जेवढे प्रयत्न झाले आहेत, तेवढेच मनमोकळेपणाने सांगता आले पाहिजेत, उदाहरणार्थ एखाद्या दिवशी सारणीलेखन केले नाही, हे प्रांजळपणे सांगता आले पाहिजे. साधनेतील अडचणी-अडथळे कुठलीही प्रतिमा न बाळगता मनमोकळेपणाने सांगितले पाहिजेत. असे प्रयत्न केले, तरच व्यष्टी आढाव्याचा खरा लाभ होतो. खरे तर प्राथमिक अवस्थेतील साधकाला साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी व्यष्टी आढावा सेवकाला दायित्व दिलेले असते; परंतु त्याच्याशी मनमोकळेपणाने न बोलल्याने साधनेतील प्राथमिक अडचणीसुद्धा सुटण्याचा मार्ग बंद होतो.
६ इ. कार्यात्मक अडचणींविषयी मनमोकळेपणाने न बोलणे : हा पैलू समष्टी साधनेतील सर्वांत घातक पैलू आहे. अध्यात्मप्रसाराचे कार्य करतांना अनेक वेळा स्थानिक अडचणी असतात. त्या अडचणी व्यक्तीगत स्तरावर सोडवण्यासाठी उत्तरदायी साधकांना मर्यादा असू शकतात; परंतु अशा अडचणी योग्य उत्तरदायी साधकांसमोर मांडल्या नाहीत, तर त्या कधीच सुटणार नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. कार्यात्मक अडचणी वेळोवेळी मनमोकळेपणाने मांडल्याने त्यावर उपाययोजना काढण्यासाठी नवीन नवीन पर्याय मिळतात. नवीन प्रयत्नांची दिशा मिळते.
७. सहसाधकांच्या मनमोकळेपणाच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेला दृष्टीकोन
‘एकत्र सेवा करणाऱ्या २ सहसाधकांनी स्वतःच्या सेवेच्या संदर्भात बोलणे, एकमेकांची वैयक्तिक विचारपूस करणे किंवा हास्यविनोद करणे, म्हणजे साधनेतील मनमोकळेपणा नाही. साधनेमध्ये एकमेकांना साहाय्य करण्याच्या हेतूने सहसाधकांनी मनमोकळेपणाने बोलायला हवे’, असे एका सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले होते.
८. साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने बोलण्यासाठी काही प्रयत्न
अ. साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने न बोलण्यामागील दोषांची व्याप्ती काढून व्यष्टी आढावा सेवकाला सांगावी. त्या दृष्टीने आढावा सेवक साधकाला साहाय्य करू शकतो.
आ. भिडस्तपणा आणि आत्मविश्वास न्यून असणे, या दोषांमुळे मनमोकळेपणाने बोलले जात नसल्यास ‘प्रसंगाचा सराव’ पद्धतीची स्वयंसूचना घ्यावी.
‘साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने बोलण्याचा लाभ दीर्घकालीन, म्हणजेच जीवनभर आहे’, हे लक्षात घेऊन आजपासूनच साधनेतील अडचणींविषयी मार्गदर्शक संत, उन्नत साधक, उत्तरदायी साधक, व्यष्टी साधनेचा आढावा घेणारा साधक, आध्यात्मिक मित्र, समष्टी साधनेतील सहसाधक इत्यादींशी बोलण्यास प्रारंभ करा !
९. मनमोकळेपणाने स्वीकारणे
साधनेमध्ये मनमोकळेपणाचे बोलणे जेवढे महत्त्वाचे असते, तेवढे मनमोकळेपणे स्वीकारणेही महत्त्वाचे असते. इतरांनी केलेल्या सूचना, लक्षात आणून दिलेल्या चुका, सांगितलेली सत्सेवा, तसेच व्यष्टी साधनेच्या आढाव्यात दिलेला साधनेचा दृष्टीकोन मनमोकळेपणाने स्वीकारणे महत्त्वाचे असते, उदाहरणार्थ उत्तरदायी संत किंवा साधक यांच्याशी साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने बोलल्यानंतर ते त्याविषयी मार्गदर्शक सूत्रे सांगतात. ही मार्गदर्शक सूत्रे ऐकल्यानंतर तत्क्षणी मनात विचार, शंका, अडचणी उत्पन्न होऊ शकतात. या संदर्भात त्यांना पुन्हा मोकळेपणाने विचारणे आणि त्यावरील मार्गदर्शन ऐकल्यानंतर ते पूर्णतः स्वीकारणे अपेक्षित असते. जेव्हा साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने बोलणे आणि स्वीकारणे, असे दोन्ही होऊ लागते, तेव्हा आपली आध्यात्मिक उन्नती होऊ लागली आहे, असे समजावे.
९ अ. मनमोकळेपणाने स्वीकारणे, हा पैलू वाढवण्यासाठी करावयाचे काही प्रयत्न
१. इतरांनी केलेल्या सूचना जिज्ञासेने स्वीकारणे आणि त्यांविषयी मनमोकळेपणे चर्चा करणे
२. इतरांनी लक्षात आणून दिलेल्या चुका मनापासून स्वीकारणे आणि त्यांविषयी क्षमायाचना करणे
३. सांगितली गेलेली सेवा स्वतःची आवड-निवड न जोपासता भावपूर्ण आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणे
४. मार्गदर्शक संत, उन्नत साधक, उत्तरदायी साधक, व्यष्टी आढावा घेणारा साधक, आध्यात्मिक मित्र, समष्टी साधनेतील सहसाधक इत्यादींनी दिलेला साधनेचा दृष्टीकोन स्वीकारणे, तसेच त्यात असलेल्या शंका मनमोकळेपणाने विचारणे
१०. व्यष्टी साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणा हवा, तर समष्टी साधनेच्या संदर्भात मोकळेपणा हवा !
साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने बोलणे, म्हणजे मनातील विचार प्रक्रियेविषयी साधनेतील उन्नत साधकांशी बोलणे, असे असते. समष्टी साधनेत अंतर्मनातील प्रक्रिया सांगू नये; कारण तेथे धोरणात्मक संवाद साधायचा असतो. हा संवाद साधतांना मोकळेपणा असला पाहिजे, म्हणजे इतरांमध्ये मिसळणारे बोलणे असले पाहिजे. या संदर्भातील काही पैलू आपण समजून घेऊया.
१० अ. सत्संगात अपरिचित प्रश्नाचे उत्तर देण्याच्या संदर्भात मोकळेपणा हवा ! : सत्संगात विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर ठाऊक नसल्यास सत्संगसेवकाला सत्संगात मोकळेपणाने सांगता आले पाहिजे की, मला या प्रश्नाचे उत्तर ठाऊक नाही. मी याविषयी अभ्यास करून किंवा उन्नत साधकांना विचारून पुढील सत्संगात उत्तर देईन.
१० आ. हिंदुत्वनिष्ठांशी संवाद साधतांना मोकळेपणा हवा ! : काही साधक समविचारी संघटनांचे पदाधिकारी, हिंदुत्वनिष्ठ आदींशी मोकळेपणाने बोलत नाहीत. याविषयी अभ्यास केल्यानंतर लक्षात आले की, साधकांच्या मनात संबंधित व्यक्तीविषयी पूर्वग्रह होता. पूर्वग्रह असेल, तर मोकळेपणाने बोलता येत नाही. समविचारी संघटनांशी भविष्यात कधी ना कधी एकत्रित कार्य करावे लागणार असल्याने साधकांनी हा पूर्वग्रह त्यागला पाहिजे.
१० इ. मोकळेपणाने बोलण्यासाठी संघटनेच्या श्रेष्ठत्वाचा अहंकार नको ! : काही साधकांच्या मनात ‘आपली संघटना श्रेष्ठ असून दुसरी संघटना सामान्य आहे किंवा भावनिक स्तरावर कार्य करणारी आहे’, असा अहंकाराचा विचार असतो. समष्टी कार्य करतांना सर्व प्रकारच्या स्वभाव असलेल्या संघटनांशी संपर्क येतो, तेव्हा संघटनात्मक अहंकार बाजूला सारून सर्वांशी मैत्री ठेवण्याच्या दृष्टीने मोकळेपणाने संवाद साधला पाहिजे.
१० ई. आपल्या क्षमतेपेक्षा बुद्धीमान समाजाशी संवाद साधतांना मोकळेपणा नसणे : ही अडचण अनेक ठिकाणच्या साधकांनी सांगितली आहे. आपण समाजात ‘अध्यात्म-साधना’ आणि ‘हिंदु राष्ट्र’, असे दोन विषय घेऊन जात असतो. आपले या विषयांवरील ग्रंथ असल्याने आपला या विषयांवरचा अभ्यास चांगला झालेला असतो. थोडक्यात आपल्या गुरूंनी दिलेल्या विषयांतील तज्ञता आपल्याकडे असते. समाजातील बुद्धीमान समाज, हा त्यांच्या क्षेत्राशी संबंधित तज्ञ असतो. साधकाला त्यांच्याशी संवाद हा ‘अध्यात्म-साधना’ आणि ‘हिंदु राष्ट्र’ या दोन विषयांवर प्रामुख्याने करायचा असल्याने या विषयांचा अभ्यास करून जाणे आणि मोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधणे अपेक्षित असते.
१० उ. कुटुंब, कार्यालय आणि समाज अशा सर्व ठिकाणी मोकळेपणा हवा ! : वैयक्तिक जीवन, व्यवहार, नातेवाईक किंवा सहकर्मचारी यांच्याशी स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न करावा. हा मोकळेपणा आपले समष्टी व्यक्तीमत्त्व विकसित करतो. मोकळेपणाने संवाद असल्यास कुटुंबातही भांडण-तंटे न होता संवाद होतो.
(साधनेसाठी मार्गदर्शक असलेला हा लेख साधकांनी संग्रहासाठी ठेवावा.)
– श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.