पिंपरी (पुणे) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून निगडीतील ‘अ’ प्रभागात असलेले संगीत अकादमीच्या नुतनीकरणाच्या (स्थापत्यविषयक आणि सुधारणा) कामासाठी तब्बल ३ कोटी ३७ लाख ५१ सहस्र १६४ रुपयांची निविदा काढण्यात येत आहे. दुरुस्तीच्या नावावर करोडो रुपयांची उधळपट्टी महापालिकेने थांबवावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव तथा कलारंग संस्थेचे संस्थापक अमित गोरखे यांनी केली आहे. हे संगीत अकादमी महानगरपालिकेच्या संत तुकाराम महाराज व्यापारी संकुलाच्या शेवटच्या मजल्यावर ८ सहस्र चौरस फूट जागेत आहे. त्या अकादमीचे नुतनीकरण करण्यापेक्षा निगडी प्राधिकरणामध्ये नवीन जागेत नाट्यगृह बांधून होईल, असेही गोरखे यांनी नमूद केले आहे.