पुणे – शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर मध्यरात्रीपर्यंत वाहनांची वर्दळ कायम रहात असल्याने मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीचे नियोजन करा, अशी सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना ३ पाळ्यांमध्ये (शिफ्ट) काम विभागून देण्यात येणार असल्याने त्यांना रात्रपाळीतही काम करावे लागणार आहे. कोरेगाव पार्क, मुंढवा, कोंढवा, जंगली महाराज रस्ता, बाणेर रस्ता, गणेशखिंड रस्ता, स्वारगेट, मार्केटयार्ड, हडपसर आणि कोथरूड या विभागातील वाहतूक पोलिसांना वाहतूक नियोजन करण्याची सूचना देण्यात आली आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.