सोलापूर – आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे १५ लाख भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. वारकर्यांना गर्दीच्या काळात साहाय्य व्हावे यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने प्रथमच ‘पंढरीची वारी’ हे भ्रमणभाषवरील ‘अॅप’ सिद्ध केले आहे. त्यावर वारीच्या काळात प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा आणि पंढरपूर येथे येणारे वारकरी यांना पुरवण्यात येणार्या सुविधांची माहिती मिळेल. पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागातील ६ विद्यार्थ्यांनी दीड मासामध्ये या ‘अॅप’ची निर्मिती केली आहे. ‘प्ले स्टोअर’वर ‘Pandharichi Wari’ या नावाने ‘ॲप’ उपलब्ध आहे.
आगामी काळात या ‘ॲप’मध्ये हेल्पलाइन क्रमांक, गॅस सिलिंडरची सुविधा, एस्.टी., रेल्वेचे वेळापत्रक यांचाही समावेश करण्यात येणार असल्याचे गटप्रमुख सुदर्शन मकर यांनी सांगितले. वारीच्या काळात होणार्या गर्दीची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ‘अॅप’विषयी कल्पना सुचवली होती. ‘वारकर्यांना पाणी, शौचालय, रुग्णालय या सुविधा देण्यासाठी ‘अॅप’ महत्त्वाची भूमिका बजावेल. ‘अॅप’मध्ये आवश्यकतेनुसार आणखी पालट केले जाणार आहेत, असे मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.
कुठे वापरता येणार ‘अॅप’ ?
पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाल्यानंतर या ‘अॅप’चा वापर करता येणार आहे. पंढरपूर येथे सर्व पालख्या पोचल्यानंतरही हे ‘अॅप’ दिशादर्शक ठरेल. विठ्ठल मंदिराकडे जाण्याच्या मार्गासमवेतच महत्त्वाची ठिकाणे दाखवली जाणार आहेत. पालखीची मुक्कामाची ठिकाणे, विसावा या ठिकाणी असलेल्या सुविधा या ‘ॲप’वरून शोधणे सोपे होणार आहे.
आषाढी वारीसाठी पुणे विभागाकडून ५३० बसगाड्यांची सोय !
पुणे – यंदाची आषाढी वारी २ वर्षानंतर होणार असल्यामुळे वारकर्यांच्या सोयीसाठी एस्.टी. महामंडळ पुणे विभागातून ५३० बसगाड्या पंढरपूर वारीसाठी पाठवणार आहेत. पुणे-देहू-आळंदी अशा अंतर्गत वाहतुकीसाठीही ६० बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. ४० जणांच्या समुहामध्ये एकत्रित आरक्षण केल्यास एस्.टी. प्रवाशांना पंढरपूर येथे सोडेल आणि त्यानंतर तेथून त्यांना त्यांच्या गावी सोडण्याची सुविधाही उपलब्ध आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन एस्.टी. प्रशासनाने केले आहे.