भोर (पुणे) – तालुक्याच्या हिर्डोशी आणि नीरा देवघर धरणांच्या खोऱ्यातील १४ गावांमधील वन विभागाच्या २ सहस्र ८४४ हेक्टर क्षेत्राला ‘संवर्धन राखीव क्षेत्रा’चा दर्जा (कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) देण्यात आला आहे. यामध्ये तालुक्यातील शिरगाव, उंबरगणी, उंबर्डे, दुर्गाडी, कुडली बुद्रूक, कुडली खुर्द, गुढे, निवंगणा, धानवडी, रायरी, दापकेघर, कारी, वडतुंबी, पऱ्हर बुद्रूक या गावांचा समावेश आहे.
या भागात ४२० प्रकारच्या वनस्पती आणि ६६० पुष्प वनस्पती यांची नोंद आहे. यांपैकी १०८ पुष्प वनस्पती केवळ याच परिसरामध्ये आढळतात. या क्षेत्रामध्ये वन्यप्राण्यांचे संवर्धन करण्यासमवेतच स्थानिक लोकांचे बळकटीकरण करून पर्यटनाला चालना देणे आदी गोष्टींचा विचार करण्यात येणार आहे, अशी माहिती भोरच्या उपविभागीय वन अधिकारी आशा भोंग आणि वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रेय मिसाळ यांनी दिली.