इस्लामचे संस्थापक महंमद पैगंबर यांच्याविषयी भाजपच्या तत्कालीन राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून किमान १५ इस्लामी देशांनी भारताच्या विरोधात दंड थोपटले आहेत. सत्ताधारी पक्षाच्या आणि त्यातही हिंदुत्वनिष्ठ भाजपच्या प्रवक्त्याचे वक्तव्य असल्याने तर त्यांना आणखीनच चेव चढला आहे. ‘खरेतर नूपुर शर्मा यांनी ‘हदीस’मधील तथ्याचाच पुनरुच्चार केला होता. हदीस म्हणजे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये महंमद पैगंबर कसे वागले ? कसे बोलले ? याचा कोश ! आता ऐतिहासिक तथ्य मांडले, तर त्यात चूक तरी काय आहे; परंतु यातून भारताला वेठीस धरण्याचा आणि ‘आम्हीच इस्लामचे सर्वांत मोठे संरक्षक आहोत’, असे दाखवण्याचा आटापिटा बहुतांश इस्लामी देशांकडून केला जात आहे. ‘इस्लामचा अवमान (?) आम्ही खपवून घेणार नाही’, असे म्हणणाऱ्या बाहरीनने वर्ष २०२० मध्ये त्यांच्या देशातील एका ‘सुपरमार्केट’मध्ये काही बुरखाधारी महिलांकडून ‘अल्ला हू अकबर’च्या (‘अल्ला महान आहे’ याच्या) घोषणा देत तेथे मांडण्यात आलेल्या श्री गणेशमूर्ती फेकून दिल्याच्या विरोधात कोणती कारवाई केली ? अन्य धर्माचा अनादर खपवून घेणारे हे देश हिंदूंच्या विरोधात मात्र त्वरित एकत्र येतात. भारताला ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणून न पहाता ‘हिंदूंचा हिंदुस्थान’ या चष्म्याने पाहिले जाते, हे हिंदूंनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
डेन्मार्क आणि फ्रान्स नंतर भारत !
भारताला आज ज्या विरोधाचा सामना करावा लागत आहे, तसाच अनुभव गेल्या दीड दशकात जगाने किमान दोनदा घेतला आहे. वर्ष २००६ मध्ये डेन्मार्कमध्ये कोण्या एका चित्रकाराने महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढले, तेव्हा इस्लामी जगताने सर्वत्र हाहा:कार माजवला होता. वर्ष २०२० मध्ये फ्रान्समधील शिक्षक सॅम्युएल पॅटी यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी ‘शार्ली हेब्दो’ या साप्ताहिकाने काढलेल्या व्यंगचित्राविषयी वक्तव्य केल्याने जिहादी विचारसरणी असणाऱ्या त्यांच्याच विद्यार्थ्याने त्यांची हत्या केली. त्यावर फ्रान्सने इस्लामविरोधी मोहीम हाती घेतली होती. तेव्हाही इस्लामी जगताने फ्रान्सच्या उत्पादनांवर बहिष्कार घातला होता. कणखर भूमिका घेतलेल्या फ्रान्सच्या साम्यवादी विचारसरणीचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे या विरोधास बधले नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे पंतप्रधान मोदी आणि त्यांचे शासन हे उजव्या विचारसरणीचे आहे, असा समज आहे. त्यात काही अंशी तथ्यही आहे; परंतु पक्षाने नूपुर शर्मा यांच्याविरोधात केलेल्या कारवाईने हिंदू आश्चर्यचकित झाले. साम्यवादी अन् त्यातही पुरोगामी फ्रान्सकडून तत्त्वनिष्ठ धोरण राबवण्याची संधी हिंदु भारताने दवडायला नको, एवढीच हिंदूंची अपेक्षा ! अर्थात् देहली पोलिसांनी एम्.आय.एम्.चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि हिंदूंच्या देवतांच्या विरोधात गरळओक करणाऱ्या अन्यांच्या विरोधातही आता गुन्हे नोंदवायला आरंभ केला आहे, ही जमेची बाजू म्हणायला हरकत नाही !
काँग्रेसचे दुखणे !
या भूमिकेच्या स्तरावर स्वत: भाजपने नूपुर शर्मा आणि बडतर्फ करण्यात आलेले देहली भाजपचे माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांना ‘फ्रिंज’ असल्याचे (पक्षाचा आधार नसल्याचे) संबोधून ‘पक्षाची तशी भूमिका नाही’, असे म्हणत वादातून काढता पाय घेतला. मुसलमानी लांगूलचालनाचे ‘पेटंट’ घेतलेली काँग्रेस या सर्वांवर शांत तरी कशी बसणार ? त्यांचे प्रवक्ते प्रवीण खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकेकाळी ‘फ्रिंज’ असल्याचे (जनाधार नसल्याचे) संबोधून ‘आज ते ‘मेनस्ट्रीम’ (मुख्य प्रवाहातील) झाले’, अशी टीका केली. तसेच ऑक्सफर्ड विद्यापिठात जाऊन ‘भारत हे राष्ट्र नसून विविध राज्यांचे एकत्रीकरण आहे’, अशा प्रकारे इतिहासाची अन् हिंदूंच्या संस्कृतीची प्रतारणा केलेले काँग्रेसचे युवराज म्हणाले, ‘फ्रिंज’ हे भाजपचे मूळ आहे !’ त्यांनी हे ट्वीट करतांना गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या काही वर्षांपूर्वीच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांचा दाखला दिला. आज हे सर्व नेते मुख्य प्रवाहातील झाले आहेत. तसेच उद्या नूपुर शर्मा यांचेही होऊ शकेल, असे राहुल गांधी यांना सुचवायचे आहे. कुणी काय बोलावे ? याचा प्रत्येकाला अधिकार आहे. व्यक्तीस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य आदी संज्ञांचा उमाळा आपल्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून डोके वर काढत असतोच ! विशेषकरून त्यांचा उपयोग बहुसंख्यांक हिंदूंच्या विरोधात ‘राजकीय अस्त्र’ म्हणून होत असतो; परंतु आपण काय बोलतो ? बरळतो याचे सुवेरसुतक या महाशयांना उरलेले नाही. गांधी, खेरा आणि त्यांच्या चमूने अंतर्मुख होऊन पाहिल्यास काही वर्षांपूर्वीपर्यंत ‘मेनस्ट्रीम’ (?) असणारी काँग्रेस आज ‘फ्रिंज’ झाली आहे. एवढेच काय, तर जे राजकीय धोरण अवलंबून ती निवडून येत असे, तो ‘मुसलमानी अनुनय’ही आता इतिहासजमा होत चालला आहे. युवराजांना ‘मी जनेऊधारी (जानवेधारी) ब्राह्मण आहे’, अशा प्रकारे वक्तव्ये करावी लागतात, यात हे सर्व आलेच !
अन्ते मती सा गती ।
रहाता राहिला प्रश्न तो भाजपचा ! भाजपचे अथवा मुळातच हिंदुत्वनिष्ठांचे म्हणा, त्यांचे धोरण कधी ‘फ्रिंज’ नव्हतेच ! काँग्रेस आणि तिला साहाय्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय शक्तींनी हिंदुद्वेष्टे ‘सबव्हर्जन’ (समाजाला त्याच्या मूळ संस्कृतीचा विसर पाडण्यासाठी राबवण्यात येणारे धोरण) राबवून हिंदुत्वाला अन् त्याच्या दैवी शिकवणीला झाकोळले होते. ‘धर्मनिरपेक्षतावादा’ची ही काजळी आता दूर होऊ लागली आहे. हिंदू जागरूक होत आहेत, हिंदुहिताच्या पर्यायाने राष्ट्रहिताच्या निर्णयांचे पडघम् देशात वाजू लागले आहेत. हेच काँग्रेसचे दुखणे होऊन बसले आहे. ‘अन्ते मती सा गती ।’ यानुसार काँग्रेसची समीप आलेली मृत्यूघंटा तिला स्वत:ला दिसत नाही. त्यामुळे ती आताही हिंदूंना विसरत आहे. हीच मती (बुद्धी) पाहून हिंदू तिला राजकीयदृष्ट्या अधो‘गती’ देण्यास सज्ज झाले आहेत, हे तिने विसरू नये ! कालाय तस्मै नम: । दुसरे काय ?
काँग्रेसची हिंदुद्वेष्टी ‘मती’ पाहून हिंदू तिला राजकीयदृष्ट्या अधो‘गती’ देण्यास सज्ज आहेत, हे तिने विसरता कामा नये ! |