मिरज, ९ जून (वार्ता.) – येथील सनातनच्या आश्रमात रहाणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची सनातनची साधिका कु. ऐश्वर्या योगेश जोशी हिला १२ वीच्या परीक्षेत ८०.३३ टक्के (६०० पैकी ४८२) गुण मिळाले आहेत. ती मिरज येथील ‘ज्युबिली ज्युनियर कॉलेज’ची विद्यार्थिनी आहे.
तिला मिळालेल्या गुणांविषयी कु. ऐश्वर्या म्हणाली, ‘‘माझे १२ वीचे वर्ष चालू असतांना कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे सर्व वर्ग ‘ऑनलाईन’ होते. असे असतांनाही सेवेसाठी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात जाण्याची संधी मिळाली. तिथे अभ्यास, सेवा आणि व्यष्टी साधना यांचे नियोजन करून दिले होते. अभ्यासासमवेत सेवा आणि व्यष्टी साधनेचे प्रयत्न केल्याने त्याचा अभ्यासातही लाभ झाला. नियमित सारणी लिखाण आणि स्वयंसूचना घेतल्याने अभ्यासाचा ताण न्यून झाला, तसेच परीक्षेची भीतीही न्यून झाली. प्रसंगाचा सराव यावर स्वयंसूचना घेतल्याने परीक्षेला जातांना आत्मविश्वास वाढला. गुरुमाऊलींनी हे प्रयत्न करवून घेतले, गुरुमाऊलींची कृपा आणि पू. जयराम जोशी (कु. ऐश्वर्या हिचे आजोबा) यांच्या आशीर्वादानेच, हे यश संपादन करता आले, याविषयी त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करते.’’