साधकांच्या मनातील आध्यात्मिक इच्छा जाणून त्या पूर्ण करणारे सर्वांतर्यामी असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेला मंगलमय रथोत्सव …

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. मंगळुरू येथील श्रीवेंकटरमणाच्या रथोत्सवात रथ ओढण्याची इच्छा पूर्ण होऊ न शकणे, पुढे ती इच्छा विसरणे

लहानपणापासून माझ्या मनात आमच्या गावी (मंगळुरू येथे) होणाऱ्या श्री वेंकटरमणाच्या (बालाजीच्या) रथोत्सवात रथ ओढायची इच्छा होती; पण मला ती संधी कधी मिळाली नाही. प्रत्येक वर्षी जगन्नाथपुरी (ओडिशा) येथील श्री जगन्नाथाच्या यात्रेचा वृत्तांत वाचल्यावर मला या महत्कार्यात सेवा करायची इच्छा होत असे. माझी ती इच्छा अपूर्ण राहिली होती.

श्री. अभिषेक पै

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मंगलमय रथोत्सवानंतर रथ आश्रमात परत येतांना आश्रमाच्या चढावावरून थोडा खाली घसरल्यावर मनात ‘आम्ही रथाला मागून आधार दिला, तर रथ मागे सरकणार नाही’, असा विचार येणे

२२.५.२०२२ या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या मंगलमय रथोत्सवानंतर रथ रामनाथी आश्रमात परत आला. आश्रमातील चढावावरून रथ पुढे जातांना तो थोडा मागे सरकला. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘आम्ही रथाला मागून आधार दिला, तर रथ मागे सरकणार नाही.’ मी आणि २ – ३ साधक रथाच्या मागेच होतो. आम्ही लगेचच मागून तो रथ पुढे ढकलायचा प्रयत्न केला.

३. अखिल ब्रह्मांडनायकाच्या रथाला आधार देण्याचा विचार म्हणजे ‘मोठा अहं किंवा अज्ञान आहे’, याची जाणीव होणे

त्या क्षणी माझी विवेकबुद्धी जागृत झाली आणि माझ्या लक्षात आले, ‘केवढे हे माझे अज्ञान ! केवढा हा माझा अहं ! जो अखिल ब्रह्मांडनायक आहे, त्या श्रीमन्नारायणाच्या रथाला मी काय आधार देणार ? या रथाच्या स्पर्शाने माझेच अनेक जन्मांचे प्रारब्ध नष्ट झाले आहे. ही तर गुरुदेवांनी माझ्यावर केलेली मोठी कृपाच आहे.’

४. रथ पुढे ढकलण्यासाठी मागून धक्का दिल्यावर स्वतःच्या इच्छेची आठवण होऊन ‘देवाने इच्छा पूर्ण केली’, हे लक्षात येणे

रथ पुढे ढकलल्यानंतर माझ्या मनात लहानपणापासून असलेली श्री वेंकटरमणाचा रथ ओढण्याची इच्छा मला आठवली आणि देवाने ती इच्छा पूर्ण केली; म्हणून कृतज्ञता वाटली. ‘माझी इच्छा पूर्ण करण्यासाठीच गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) हा प्रसंग घडवला’, असे मला वाटले.

५. साधकांची इच्छापूर्ती करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

आजवरचा माझा अनुभव हाच आहे की, ‘माझी प्रत्येक इच्छा, ती व्यक्त असो किंवा सुप्त असो, गुरुदेव ती पूर्ण करतातच ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मंगलमय ‘रथोत्सवा’च्या निमित्ताने माझी सुप्त राहिलेली इच्छा सर्वज्ञानी गुरुदेवांनी पूर्ण केली. यासाठी गुरुदेवांच्या चरणी आणि रथोत्सव साजरा करण्याची आज्ञा देणाऱ्या महर्षींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

– श्री. अभिषेक अण्णप्पा पै, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.५.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक