केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतली भेट
हरिद्वार – छत्तीसगडच्या रायपूर येथील शदाणी दरबार तीर्थच्या प्रतिनिधीमंडळाने देहली येथे जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नुकतीच भेट घेतली. या प्रसंगी तीर्थचे पीठाधीश्वर पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज यांनी गृहमंत्र्यांना पाकमधून आलेल्या हिंदु कुटुंबांना भारताचे नागरिकत्व मिळण्यात येणार्या अडचणींविषयी अवगत केले. महाराज म्हणाले की, पाकहून भारतात आश्रय घेणारे हिंदू स्वत:ला सुरक्षित समजतात. भारत सरकारने पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना कायमस्वरूपी नागरिकत्व द्यावे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. यावर गृहमंत्र्यांनी ‘पाकमधील सर्व हिंदु निर्वासितांना लवकरच भारताचे नागरिकत्व दिले जाईल’, असे आश्वासन दिले.
प्रतिनिधीमंडळामध्ये पू. डॉ. युधिष्ठिर लाल महाराज यांच्यासमवेत माजी आमदार श्रीचंद सुंदरानी, उदय शदाणी, ललित जयसिंह आणि नंद लाल साहित्य यांचा समावेश होता. पाकमधून भारतात आश्रय घेणारे अनेक सिंधी कुटुंबे रायपूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून रहात आहेत. त्यांना अद्यापही नागरिकत्व न मिळाल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे माजी आमदार श्रीचंद सुंदरानी यांनी गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. या वेळी अमित शहा म्हणाले की, काही दिवसांतच पाकच्या निर्वासित हिंदूंच्या विषयावर ते एक महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी प्रतिनिधीमंडळाच्या सदस्यांनाही आमंत्रित करण्यात येईल. या बैठकीमध्ये पाकमधून भारतात आलेल्या हिंदूंच्या नागरिकत्वाविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.