ज्ञानवापी हिंदूंकडे सोपवली पाहिजे !

  • जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे मुसलमानांना आवाहन !

  • ‘मक्के’ला ‘मक्केश्वर महादेव मंदिर’ घोषित करण्याचेही आवाहन !

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापीमध्ये सापडले ते शिवलिंगच आहे. ते आदि विश्वेश्वर आहे. पूर्ण काशीच शिवलिंग आहे. यात कुणालाही संशय नसावा. त्यामुळे ज्ञानवापी परिसर हिंदूंकडे लवकरात लवकर सोपवला पाहिजे. ज्ञानवापीचे पूर्वीचे स्वरूप आहे, ते पुन्हा एकदा स्थापित केले पाहिजे, असे आवाहन पुरी येथील पूर्वाम्नाय गोवर्धन पीठाचे पीठाधिश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी येथे केले. येथील मठामध्ये ‘हिंदु राष्ट्र संमेलना’च्या नंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते, तसेच त्यांनी ‘ताजमहाल’ला ‘तेजोमहाल’ आणि मक्का येथे मक्केश्वर महादेव मंदिर बनले पाहिजे’, असेही आवाहन केले.

शंकराचार्य म्हणाले की,

१. सनातन धर्मियांनी कोणत्याही प्रकारचा संशय बाळगू नये. आता आपण स्वतंत्र भारतात रहात आहोत आणि आपला अधिकार आहे की, आपण आपल्या मानवाधिकारांना स्थापित केले पाहिजे. मानवाधिकारापासून जगातील कोणतीच शक्ती आम्हाला वंचित ठेवू शकत नाही.

२. मंदिरे संरक्षित करण्यासाठी काशीमध्ये सर्व शंकराचार्य, मुख्य पीठांचे महंत आणि धर्माचार्य यांचे संमेलन आयोजित करण्यात येईल. याचा दिनांक लवकरच घोषित करण्यात येईल.

मुसलमानांनी पूर्वजांच्या चुका मान्य करून सहिष्णूतेचा परिचय द्यावा !

मुसलमान समाजाने त्याच्या पूर्वजांनी जे काही मानवाधिकाराचे हनन केले होते त्याला आदर्श मानू नये. मुसलमान समाजाने त्याच्या पूर्वजांच्या चुका मान्य करून सहिष्णूतेचा परिचय दिला पाहिजे. त्याद्वारे एकत्र होऊन वाटचाल केली पाहिजे, असेही शंकराचार्य म्हणाले.

वाराणसीतील ‘धरहरा मशीद’ मूळचे ‘बिंदु माधव मंदिर’ ! – न्यायालयात याचिका प्रविष्ट

वाराणसी – ज्ञानवापी मशिदीनंतर आता पंचगंगा घाटावर असलेल्या ‘धरहरा मशिदी’च्या विरोधात याचिका करण्यात आली आहे. ही मशीद पूर्वीचे ‘बिंदु माधव मंदिर’ आहे. येथे अवैध पद्धतीने नमाजपठण करण्यावर प्रतिबंध आणण्याच्या संदर्भात येथील न्यायालयात याचिका ही प्रविष्ट करण्यात आली आहे. हिंदु याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे, ‘पंचगंगा घाटावर मूळचे ‘बिंदु माधव’ नावाचे श्रीविष्णूचे मंदिर होते. औरंगजेबाने श्रीकाशी विश्वनाथ मंदिरावर जेव्हा आक्रमण केले, तेव्हाच बिंदु माधव मंदिरावरही आक्रमण करून ते नष्ट करण्यात आले होते. त्याच ठिकाणी धरहरा मशीद बांधण्यात आली होती. आता तेथे अवैधपणे नमाजपठण करण्यात येते.’ यावर ४ जुलै या दिवशी  सुनावणी होणार आहे.

संपादकीय भूमिका

भारतातील सहस्रावधी मशिदी मूळ हिंदूंची मंदिरेच आहेत, असे अनेक इतिहासतज्ञांनी पुराव्यांच्या आधारे सांगितले आहे. असे असतांना एकेका मशिदीला मुक्त करत बसण्यापेक्षा एकदाचा कायदा संमत करून अशा सर्व मशिदींचे सर्वेक्षण केले गेले पाहिजे !