१०.४.२०२२ या दिवशी म्हणजे श्रीरामनवमीला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी एका अनौपचारिक कार्यक्रमामध्ये वर्धा येथील प्रसारसेविका पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित केले. या संतसोहळ्याचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढीलप्रमाणे आहे.
१. संतपद घोषित होण्यापूर्वी कार्यक्रमातील घडामोडींचे सूक्ष्म परीक्षण
१ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आवाजातील भावार्चना ऐकत असतांना कार्यक्रमस्थळी श्रीरामतत्त्वाचे निळसर रंगाचे दैवी वातावरण निर्माण झाल्याचे जाणवणे : कार्यक्रमाच्या आरंभी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आवाजामध्ये श्रीरामनवमीच्या संदर्भातील भावार्चना (‘देवाची भावपूर्ण अर्चना करणे’, याला ‘भावार्चना’ म्हणतात. ‘अर्चना’ म्हणजे पूजादि उपाचारांनी देवाची आराधना करणे. नवविधाभक्तीमध्ये पाचव्या क्रमांकाच्या भक्तीचे नाव ‘अर्चनभक्ती’आहे. राजा पृथु आणि राजा अंबरिष यांनी अर्चनभक्तीद्वारे श्रीविष्णूची आराधना केली होती.) ऐकवण्यात आली. ती ऐकत असतांना कार्यक्रमस्थळी त्रेतायुगाचे वायूमंडल निर्माण होऊन वातावरणात रामतत्त्व कार्यरत झाल्याचे जाणवून भावजागृती झाली. तेव्हा कार्यक्रमस्थळी श्रीरामतत्त्वाचे निळसर रंगाचे दैवी वातावरण निर्माण झाल्याचे जाणवले आणि श्रीरामाला प्रिय असणाऱ्या मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध दरवळला.
१ आ. श्रीमती मंदाकिनी डगवारकाकू यांच्या आवाजातील भावार्चना ऐकत असतांना कार्यक्रमस्थळी श्रीकृष्णतत्त्वाचे निळसर रंगाचे दैवी वातावरण निर्माण झाल्याचे जाणवणे : कार्यक्रमाच्या पुढील भागात श्रीमती मंदाकिनी डगवारकाकू यांच्या आवाजात श्रीकृष्णाशी संबंधित असणारी भावार्चना ऐकवण्यात आली. तेव्हा ‘तो आवाज कुणाचा आहे ? ’, हे आम्हाला माहिती नव्हते, तरीही तो आवाज ‘श्रीमती मंदाकिनी डगवारकाकू यांचा आहे’, हा विचार श्री. राम होनप आणि माझ्या मनात एकाच वेळी आला. हा आवाज ऐकत असतांना कार्यक्रमस्थळी श्रीकृष्णतत्त्वाचे निळसर रंगाचे दैवी वातावरण निर्माण झाल्याचे जाणवले आणि श्रीकृष्णाला प्रिय असणाऱ्या गोपीचंदनाचा सुगंध दरवळला. तेव्हा श्रीमती डगवार काकूंनी सांगितल्याप्रमाणे ‘प्रत्येक जण ३ वर्षांची बालगोपी होऊन श्रीकृष्णाच्या लीला अनुभवत आहे’, असे जाणवले.
१ इ. कार्यक्रमाला आरंभ झाल्यावर व्यासपिठाच्या डाव्या बाजूला ठेवलेल्या श्रीकृष्णाच्या चित्रातील श्रीकृष्ण पुष्कळ प्रमाणात सजीव झाल्याचे जाणवणे : कार्यक्रमाला आरंभ झाल्यावर व्यासपिठाच्या डाव्या बाजूला ठेवलेल्या श्रीकृष्णाच्या चित्रातील श्रीकृष्ण पुष्कळ प्रमाणात सजीव झाल्याचे जाणवले. त्यामुळे त्याने परिधान केलेले सुवर्णालंकार चमकत असल्याचे जाणवले आणि ‘श्रीकृष्ण कोणत्याही क्षणी चित्रातून बाहेर येईल’, असे मला जाणवले.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीमती डगवारकाकू यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित केल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे
२ अ. पू. डगवारकाकूंच्या दिव्यत्वाची प्रचीती येणे : पू. (श्रीमती) डगवारकाकू यांच्या कुंडलिनीचा प्रवाह विशुद्ध चक्रातून आज्ञाचक्रापर्यंत पोचला आणि त्यांच्या आज्ञाचक्रातून चैतन्याचा पिवळ्या रंगाचा प्रकाशझोत वातावरणात प्रक्षेपित झाला. त्याच वेळी त्यांच्या डोक्याच्या मागे चैतन्यमय पिवळसर रंगाचे तेजोवलय फिरतांना दिसले आणि त्यांच्या देहातून कस्तूरीचा दैवी सुगंध वातावरणात दरवळला. यावरून पू. डगवारकाकूंच्या दिव्यत्वाची प्रचीती आली.
२ आ. पू. डगवारकाकूंच्या भोवती जनलोकाचे वायूमंडल सूक्ष्मातून कार्यरत होणे : पू. डगवारकाकूंच्या भोवती जनलोकाचे वायूमंडल सूक्ष्मातून कार्यरत झाल्यामुळे कार्यक्रमस्थळी जनलोकाचे पिवळसर रंगाचे दैवी वायूमंडल निर्माण झाले. त्यामुळे वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य आणि आनंद यांची उधळण झाली.
२ इ. पू. डगवारकाकूंचा संतसोहळा पहाण्यासाठी नक्षत्रलोकातील ‘नक्षत्रदेवता’ तारकांच्या आणि महा, जन, तप आणि सत्य या लोकांतील ऋषीमुनी दिव्य ज्योतींच्या रूपात कार्यक्रमाला उपस्थित रहाणे : पू. डगवारकाकूंचा संतसोहळा पहाण्यासाठी नक्षत्रलोकातील ‘नक्षत्रदेवता’ कार्यक्रमस्थळी तारकांच्या रूपात आल्या होत्या. तारकांच्या रूपात आलेल्या नक्षत्रदेवता दैवी प्रकाशकणांप्रमाणे चमकत होत्या, तसेच महा, जन, तप आणि सत्य या लोकांतील ऋषिमुनी दिव्य ज्योतींच्या रूपात कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. श्रीमती डगवारकाकूंचा स्थूलदेह जरी पृथ्वीवर असला, तरी त्यांच्या सूक्ष्म देहाचे स्थान जनलोकात निर्माण झाले. त्यामुळे महर्लाेक ते सत्यलोक येथे वास करणाऱ्या ऋषिमुनींना आनंद झाल्याचे जाणवले. त्यामुळे ते पू. डगवारकाकूंच्या संतसोहळ्यात उपस्थित राहून पृथ्वीवरील दिव्यसोहळ्याचा आनंद अनुभवत होते. त्यांच्या हृदयातील आनंद त्यांनी पू. डगवारकाकूंवर सूक्ष्मातून दैवी पुष्पवृष्टी करून व्यक्त केला.
२ ई. पू. डगवारकाकूंचे संतपद घोषित झाल्यावर कार्यक्रमस्थळी ठेवलेले श्रीकृष्णाचे चित्र दिप्तीमान झाल्याचे जाणवणे : पू. डगवारकाकूंचे संतपद घोषित झाल्यावर कार्यक्रमस्थळी ठेवलेले श्रीकृष्णाचे चित्र दिप्तीमान झाल्याचे जाणवले. त्यामुळे श्रीकृष्णाच्या चित्रातून कृष्णतत्त्वाचा दैवी निळसर रंगाचा प्रकाश वायूमंडलात प्रक्षेपित झाल्याचे जाणवले. हा सोहळा पहाण्यासाठी अनेक दिवसांपासून भगवान श्रीकृष्ण आतूर असल्याचे जाणवले.
२ उ. भगवान श्रीकृष्णाची तारक आणि मारक अशी दोन्ही रूपे कार्यरत झाल्याने पू. डगवार काकूंची साधना व्यष्टी अन् समष्टी स्तरावर वृद्धींगत होणार असणे
२ उ १. भगवान श्रीकृष्णाच्या तारक रूपामुळे पू. डगवारकाकूंची साधना व्यष्टी स्तरावर वृद्धींगत होणार असणे : त्यानंतर या चित्रात श्रीकृष्णाची तारक आणि मारक अशी दोन्ही रूपे कार्यरत झाल्याचे जाणवले. श्रीकृष्णाच्या तारक रूपाने सुमधुर बासरीवादन केले. त्यामुळे त्यातून प्रक्षेपित झालेले सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्य पू. डगवारकाकूंना मिळाले. त्यामुळे त्यांच्यामध्ये मध्यमा वाणीचा लोप होऊन त्यांची पश्यंती वाणी कार्यरत झाली. या दैवी ऊर्जेच्या साहाय्याने त्यांची पुढील व्यष्टी साधना चैतन्याच्या स्तरावर अधिक प्रमाणात अंतर्मनातून चालू रहाणार आहे. त्यामुळे त्यांची वाटचाल ईश्वरप्राप्तीच्या दिशेने अधिक जलद गतीने चालू झालेली आहे.
२ उ २. भगवान श्रीकृष्णाच्या मारक रूपामुळे पू. डगवारकाकूंमध्ये वाईट शक्तींशी लढून अन्य साधकांवर आध्यात्मिक उपाय करण्याची क्षमता वृद्धींगत झाल्याचे जाणवणे : त्यानंतर मला श्रीकृष्णाच्या मारक रूपाचे दर्शन झाले. तेव्हा श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र पू. डगवारकाकूंच्या भोवती वेगाने गोल फिरत असल्याचे सूक्ष्म दृश्य दिसले. तेव्हा सप्तपाताळांतील वाईट शक्ती पू. डगवारकाकूंवर सूक्ष्मातून करत असलेल्या आक्रमणांपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने त्याचे सुदर्शनचक्र त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या भोवती कार्यरत केल्याचे जाणवले. श्रीकृष्णाकडून पू. डगवारकाकूंकडे प्रक्षेपित झालेल्या मारक शक्तीमुळे पू. डगवारकाकूंमध्ये वाईट शक्तींशी लढून अन्य साधकांसाठी नामजपादी आध्यात्मिक उपाय करण्याची क्षमता वृद्धींगत झाल्याचे जाणवले.
२ ऊ. श्रीकृष्णाच्या विराट रूपाने पू. डगवारकाकू यांना काळानुसार धर्मसंस्थापना करण्याच्या कार्यात मोलाचा वाटा उचलण्यासाठी त्यांना धर्मतेज दिल्याचे जाणवणे : श्रीकृष्णाच्या विराट रूपाने पू. डगवारकाकू यांना काळानुसार धर्मसंस्थापना करण्याच्या कार्यात मोलाचा वाटा उचलण्यासाठी त्यांना धर्मतेज दिल्याचे जाणवले. त्यामुळे पू. डगवारकाकू समष्टीत जाऊन चैतन्य आणि भक्ती यांच्या स्तरावर धर्मप्रसाराची सेवा करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दैवी कार्यात दैवी योगदान देणार आहेत.
२ ए. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या रूपाने भगवान श्रीकृष्णाने पू. डगवारकाकू यांचे संतपद घोषित करून त्यांचा सन्मान केल्याचा स्वप्नदृष्टांत होणे आणि ४ – ५ दिवसांनी तसेच घडणे : ‘श्रीरामनवमीच्या तिथीला भगवान श्रीकृष्णाने पू. डगवारकाकूंना समष्टी संत म्हणून सनातनच्या ११९ व्या संत घोषित करून त्यांना मोक्षपदाकडे जाण्याचा शुभाशीर्वादच दिलेला आहे’, असे जाणवले. त्यामुळे जेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीमती डगवारकाकू यांच्या गळ्यात पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केला, तेव्हा मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या ठिकाणी पितांबरधारी भगवान श्रीकृष्णाच्या तारक रूपाचे दर्शन झाले आणि श्रीमती डगवारकाकू यांच्या ठिकाणी बालगोपीचे दर्शन झाले. या संतसोहळ्यात श्रीकृष्णाने त्याच्या प्राणप्रिय बालगोपीला संतपद बहाल करून तिचा सन्मान केल्याचे जाणवले. (हेच दृश्य मला ४ – ५ दिवसांपूर्वी दिसले होते. यावरून पू. डगवारकाकूंच्या संतपदाच्या घोषणेची देवाने मला स्वप्नाद्वारे दिलेली पूर्वसूचना असल्याचे लक्षात आले. – कु. मधुरा भोसले)
३. पू. डगवारकाकूंची जाणवलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये
३ अ. ज्याप्रमाणे बळिराजाने श्रीविष्णूची आत्मनिवेदनभक्ती केली, तशीच आत्मनिवेदनभक्ती पू. डगवारकाकूंनी श्रीकृष्णाची केलेली असणे : ज्याप्रमाणे बळिराजाने श्रीविष्णूची आत्मनिवेदनभक्ती केली, तशीच आत्मनिवेदनभक्ती पू. डगवारकाकूंनी श्रीकृष्णाची केली. त्यामुळे पू. डगवारकाकूंकडून भक्तीच्या निळसर रंगाच्या तेजोमय प्रकाशकिरणांचे वायुमंडलात प्रक्षेपण होऊन त्यांच्या सभोवतालचे वातावरण भक्तीमय होते आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा भगवंताप्रतीचा भाव जागृत होतो.
३ आ. पू. डगवारकाकूंचे मन पुष्कळ निर्मळ असल्यामुळे त्यांच्याकडे ईश्वरी चैतन्य अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन हे चैतन्य यांची वाणी, विचार आणि प्रत्येक कृती यांच्या माध्यमातून वातावरणात प्रक्षेपित होणे : पू. डगवारकाकूंचे मन पुष्कळ निर्मळ असल्यामुळे त्यांच्याकडे ईश्वरी चैतन्य अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन हे चैतन्य यांची वाणी, विचार आणि प्रत्येक कृती यांच्या माध्यमातून वातावरणात प्रक्षेपित होते. त्यामुळे त्यांच्या सभोवतालचे वातावरण चैतन्यमय होऊन त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींवरील त्रासदायक काळे आवरण पूर्णपणे नष्ट होऊन त्यांना पुष्कळ प्रमाणात चैतन्य मिळते.
३ इ. पू. डगवारकाकूंची विविध योगमार्गांनुसार झालेली व्यष्टी आणि समष्टी साधना
३ इ १. पू. डगवारकाकूंमध्ये विविध योगमार्गांनुसार वृद्धींगत झालेला गुण आणि त्यामुळे त्यांच्याकडून झालेल्या व्यष्टी साधनेचे प्रमाण
३ इ २. पू. डगवारकाकूंमध्ये विविध योगमार्गांनुसार वृद्धींगत झालेला गुण आणि त्यामुळे त्यांच्याकडून झालेल्या समष्टी साधनेचे प्रमाण
कृतज्ञता
‘श्रीगुरूंच्या कृपेमुळे पू. डगवारकाकूंची गुणवैशिष्ट्ये अनुभवण्यास मिळाली आणि त्यांच्या संतसोहळ्याच्या वेळी घडलेल्या सूक्ष्म स्तरावरील घटनांचे अवलोकन करून त्यातून शिकता आले’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कोटीश: कृतज्ञ आहे.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.४.२०२२)
|