मुंबई – मुंबईमध्ये वर्ष १९९३ मध्ये करण्यात आलेल्या साखळी बाँबस्फोटातील ४ आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अबू बकर, शोएब बाबा, सैयद कुरैशी आणि युसुफ भटाका अशी त्यांची नावे आहेत. हे आरोपी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याने या चौघांची अटक महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या २९ वर्षांपासून गुजरात आतंकवादविरोधी पथक आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग या आरोपींचा शोध घेत होते. गुजरात आतंकवादविरोधी पथकाने या आरोपींना मागील आठवड्यात अहमदाबाद येथून अटक केली. ३० मे या दिवशी या आरोपींची न्यायालयात सुनावणी झाली. आता हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे.
वर्ष १९९३ मध्ये मुंबईत करण्यात आलेल्या साखळी बाँबस्फोटात २५७ लोकांचा मृत्यू, तर ७०० हून अधिक लोक घायाळ झाले होते. या बाँबस्फोटातील आरोपींपैकी १८९ जणांविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. वर्ष २००६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने यातील १०० आरोपींना दोषी ठरवले होते.