वैशाख कृष्ण त्रयोदशी (२८.५.२०२२) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणाऱ्या सौ. मनीषा अरविंद पानसरे यांचा ४१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या समवेत सेवा करणाऱ्या सहसाधिकेने सौ. मनीषा यांना पत्र लिहून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. ती पुढे दिली आहे.
सौ. मनीषा अरविंद पानसरे यांना ४१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
प्रिय मनीषास,
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
‘तुझ्याप्रती, तुझ्यातील परात्पर गुरु डॉक्टरांप्रती किती कृतज्ञता व्यक्त करू ?’, ते कळत नाही. गेल्या ८ – ९ वर्षांपासून आपण एकत्रितपणे ग्रंथांच्या संदर्भातील सेवा करत आहोत. या कालावधीत तू मला पदोपदी साधनेत साहाय्यच करत आली आहेस. ‘तुझ्या माध्यमातून देव मला साधनेत आणि सेवेत पुढच्या पुढच्या टप्प्यात नेत आहे’, याची प्रचीती मला वेळोवेळी येत आहे.
मी निराशेत असले, तर त्यातून बाहेर येण्यासाठी तू मला योग्य दृष्टीकोन दिलेस आणि प्रेमाने त्यातून बाहेर काढलेस. ‘तू मला स्वतःत पालट घडवण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ घेऊ दिलास’, हे तुझे एक वैशिष्ट्य आहे. एकदा माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार येत होते. त्या वेळी तू मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या हस्ताक्षरातील ‘दीपाली’ असे लिहिलेला कागद पाठवला होतास. तेव्हा माझ्या मनातील नकारात्मक विचार कुठल्या कुठे पळून गेले आणि ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या भावविश्वात कधी गेले ?’, हे माझे मलाच कळले नाही.
माझ्याकडून झालेल्या चुकांची तू मला वेळप्रसंगी कठोर शब्दांत तत्त्वनिष्ठतेने जाणीव करून दिलीस आणि त्यानंतर माझ्यात झालेल्या चांगल्या पालटांविषयीही आवर्जून सांगितलेस. तुझ्यासारख्या साधकांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेल्या साहाय्यामुळेच आज मी साधनेतील आनंद अनुभवत आहे.
‘तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो’, ही आजच्या या तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना !
– तुझी, दिपाली (सुश्री (कु.) दिपाली होनप), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.५.२०२२)