पुणे शहरात ‘कर्ज अ‍ॅप’च्या माध्यमातून सहस्रोंची फसवणूक !

पुणे – ‘अल्पावधीत ५ सहस्र रुपयांपर्यंत कर्ज मिळेल’, असे संदेश पाहून अनेकजण ते ‘अ‍ॅप’ घेतात. त्वरित त्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. ते पैसे ७ दिवसांमध्ये परत करायचे असतात; मात्र ६ व्या दिवसापासून त्यांचे पैसे मागण्याचे सत्र चालू होते. तुम्ही पैसे दिले तरी ते आणखी पैसे मागतात. नाही दिले तर तुमचे ‘मॉर्फ’ (संगणकाच्या साहाय्याने मूळ छायाचित्रामध्ये पालट करणे) केलेले अश्लील छायाचित्र नातेवाइकांना पाठवतात. त्यामुळे नातेवाइकांमध्ये अपकीर्ती होते. या पद्धतीने तुम्ही त्यांच्या जाळ्यात सापडता. पुणे शहरामध्ये गेल्या ५ मासांमध्ये अशा स्वरूपाची १ सहस्रहून अधिक लोकांची फसवणूक झाली आहे.

सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस्. हाके म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांमध्ये ‘कर्ज अ‍ॅप’वरून फसवणूक झाल्याच्या असंख्य तक्रारी येत आहेत. असे अनोळखी ‘अ‍ॅप’ घेऊ नयेत. तुमचा भ्रमणभाष क्रमांक आणि भ्रमणभाषचा ताबा (एक्सेस) देऊ नये. असे कर्ज हे प्रामुख्याने फसवणूक करण्यासाठीच दिले जातात. हे ‘अ‍ॅप’ उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम, गुजरात येथे चालवत असतात. तुम्ही पाठवलेले आधारकार्ड, भ्रमणभाषवरील ‘डीपी’वरील छायाचित्र, तसेच छायाचित्र संग्रहालयातील छायाचित्रांचा ते वापर करतात.’’

संपादकीय भूमिका

अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.