पाकिस्तानात इम्रान खान यांच्या आंदोलनामुळे हिंसाचार

इम्रान खान समर्थकांनी मेट्रो स्टेशन जाळले

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वखाली त्यांच्या ‘पाकिस्तान तहरिक इन्साफ’(पीटीआय) या पक्षाकडून देशात सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. ‘आझादी मोर्चा’ नावाने त्यांनी हे आंदोलन चालू केले आहे. या मोर्चातील सहस्रोंच्या संख्येने लोक इस्लामाबामध्ये पोचले आहेत. हे आंदोलन रोखण्यासाठी पाकिस्तान सरकारने इस्लामाबादला ‘रेड झोन’ घोषित केले आहे, तर गृहमंत्रालयाने इस्लामाबादमध्ये सैन्य पाठवण्याचा आदेश दिला आहे. पीटीआयचे कार्यकर्ते शहरामध्ये प्रवेश करतांना त्यांची  पाक सरकारच्या समर्थकांशी हिंसक झटापट झाली. या वेळी इम्रान खान यांच्या समर्थकांनी इस्लामाबाद मेट्रो स्थानकाला आग लावली. यानंतर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून समर्थकांना पांगवण्याचा प्रयत्न केला गेला. काही ठिकाणी लाठीमारही करण्यात आला. यामुळे संतापलेल्या पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली.

पीटीआय पक्षाने पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या १३ पक्षांचे युती सरकार तातडीने विसर्जित करण्याची मागणी केली. यासह काळजीवाहू सरकार निर्माण करावे आणि लवकरात लवकर निवडणूक घ्यावी, अशीही पीटीआयची मागणी आहे. सध्याच्या संसदेचा कार्यकाळ ऑगस्ट २०२३ पर्यंत आहे.