गुरुदेवांनी अमुच्यासाठी पायघड्या घातल्या ।

सध्या उन्हाळ्याची तीव्रता पुष्कळ अधिक आहे. ‘साधकांचे पाय पोळू नयेत’, यासाठी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात आश्रमाच्या प्रवेशद्वारापासून आश्रमाच्या मुख्य द्वारापर्यंतच्या मार्गावर हिरव्या रंगाच्या मऊशार पायघड्या, म्हणजे ‘गालिचा भासावा’, असे बैठकसदृश जाजम अंथरले आहे. ते पाहून ‘गुरुदेव आपली किती काळजी घेतात !’, याची जाणीव होऊन माझे मन कृतज्ञतेने भरून आले. त्यातून मला ही कविता स्फुरली आहे.

देवद, पनवेल येथील सनातनचा आश्रम

गुरुदेवांनी अमुच्यासाठी पायघड्या घातल्या ।। धृ. ।।

सौ. श्रावणी फाटक

कधी कुणाची नसेही ऐपत ।
वसनी छिद्रे (टीप १) नाही बघवत ।।
अर्पणातूनी सदरा, टोपी, साड्याही मिळविल्या ।
गुरुदेवांनी अमुच्यासाठी पायघड्या घातल्या ।। १ ।।

कुणा जमेना औषधे आणण्या ।
कुणा जमेना वैद्यांकडे जाण्या ।।
वाहनातून सकल साधकमूर्ती अलगदची नेवविल्या ।
गुरुदेवांनी अमुच्यासाठी पायघड्या घातल्या ।। २ ।।

तत्पर, सक्षम, सज्ज पाकघर ते ।
चारही काळ (टीप २) अन्नपूर्णा राबते ।।
काय हवे, काय नको ते (टीप ३), इच्छा, गरजाही पुरविल्या ।
गुरुदेवांनी अमुच्यासाठी पायघड्या घातल्या ।। ३ ।।

दंतमंजन ते दंतधावना ।
भांडी कपड्यांसह साबण स्नाना ।।
स्वच्छतेसाठी केरभरणे अन् केरसुण्या पुरविल्या ।
गुरुदेवांनी अमुच्यासाठी पायघड्या घातल्या ।। ४ ।।

कपडे धुण्यास न ये खाली बसता ।
त्यांसी करविला उभ्याचा ओटा ।।
न्यूनच वाटे हेही म्हणूनी धुलाईयंत्र सेवा दिधल्या ।
गुरुदेवांनी अमुच्यासाठी पायघड्या घातल्या ।। ५ ।।

कधी कुणाचे वजन ते वाढे ।
कधी कुणाचे स्वास्थ्यही बिघडे ।।
समतोल राखण्या जिमी आणिक दुचाकीही (टीप ४) आणविल्या ।
गुरुदेवांनी अमुच्यासाठी पायघड्या घातल्या ।। ६ ।।

कुणा आवडे मऊ गोधडी ।
कुणा आवडे जाड घोंगडी ।।
पलंगासह कुणाकुणाला गाद्याही पुरविल्या ।
गुरुदेवांनी अमुच्यासाठी पायघड्या घातल्या ।। ७ ।।

सोयीसुविधा थाटच न्यारा ।
व्यक्तीगत वस्तू मिळे वापरा (टीप ५) ।।
साहित्य सारे ठेवण्यासाठी अलमाऱ्याही पुरविल्या ।
गुरुदेवांनी अमुच्यासाठी पायघड्या घातल्या ।। ८ ।।

आश्रमातून सारे येती-जाती ।
उन्हात सर्वांचे पाय पोळती ।।
जाणूनी सारे गुरुदेवांनी हिरव्या पायघड्या घातल्या ।
गुरुदेवांनी अमुच्यासाठी पायघड्या घातल्या ।। ९ ।।

उष्म्याने या थकती सारे ।
लाही होतसे ऐसे वारे ।।
वातानुकूलन यंत्राद्वारे करिती शीतल त्या खोल्या ।
गुरुदेवांनी अमुच्यासाठी पायघड्या घातल्या ।। १० ।।

वाट चालती मोक्षमार्गाची ।
रांग लांब ती या साधकांची ।।
आनंदानुभूती सकलांसी या भावपूर्ण दिधल्या ।
गुरुदेवांनी अमुच्यासाठी पायघड्या घातल्या ।। ११ ।।

सांगा मजला ऐसे का कुणी ।
विचार करतील गुरुवाचोनी ।।
या गुरूंच्या चरणी माझ्या भावफूलमाला वाहिल्या ।
गुरुदेवांनी अमुच्यासाठी पायघड्या घातल्या ।। १२ ।।

आनंदते मी मनी खरोखर ।
डोळे मिटूनी जोडते हे कर ।।
मागे वळता मजला दोन पाऊलखुणा (टीप ६) दिसल्या ।
गुरुदेवांनी अमुच्यासाठी पायघड्या घातल्या ।। १३ ।।

टीप १ – काही साधकांची परिस्थिती बेताची असते. ते खूपच जपून कपडे वापरतात. त्यांची ही समस्या जाणून गुरुदेवांनी त्यांच्यासाठी कपडे अर्पणातून मिळवले.
टीप २ – प्रचलित शब्द : चारी ठाव, म्हणजे चारही वेळा
टीप ३ – पथ्य-अपथ्याचे पदार्थ फार दक्षतेने केले जातात. गोड पदार्थ सर्वांनाच आवडतात, असे नाही. त्यामुळे गोड पदार्थ प्रसादात असताना पर्यायी तिखट पदार्थाची सोय केली जाते.
टीप ४ – बिंदूदाबन उपचार यंत्र (जिमी), तसेच व्यायामासाठी सायकलस्वरूप यंत्रे आणि इतर बिंदूदाबन यंत्रे आश्रमात उपलब्ध करून दिली आहेत.
टीप ५ – व्यक्तीगत वस्तू, म्हणजे वैयक्तिक सामान वापरण्याची संमती
टीप ६ – ‘गुरु माझ्या समवेत चालत आहेत’ किंवा ‘मी त्यांच्यामागे चालत आहे’, असे मला वाटत असले, तरी प्रत्यक्षात मागे वळून पाहिल्यावर मला आम्हा दोघांची मिळून ४ पावले न दिसता केवळ दोनच पावले दिसत आहेत, म्हणजे ‘गुरुदेवांनी मला कडेवर घेऊन अतीसुरक्षित केले आहे.’

– सौ. श्रावणी कौस्तुभ फाटक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.५.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक