शत्रूचे प्रवक्ते !

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना बहुधा भारतात कमी आणि विदेशात रहायला अधिक आवडते. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विदेश दौऱ्यांना वेळोवेळी विरोध केला खरा; परंतु त्यांच्या स्वतःकडे मात्र कुठलेही घटनात्मक पद नसतांनाी ते बऱ्याचदा विदेश दौऱ्यावर असतात. विशेष म्हणजे हा त्यांचा खासगी दौरा असतो. आताही ते लंडन येथे जाऊन आले. मग प्रश्न असा पडतो की, राहुल गांधी यांना वारंवार विदेश दौरे करण्याची आवश्यकता काय ? तेथे जाऊन ते काय करतात ? कुणाला आणि कशासाठी भेटतात ? वास्तविक असे प्रश्न विचारणे अभिव्यक्तीस्वातंत्र्यात बसणारे नाही; परंतु हे विचारायला राहुल गांधी स्वतःच भाग पाडतात. त्यांचे अनेक विदेश दौरे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने विचार करायला लावणारे ठरतात.

काही वर्षांपूर्वी गांधी यांनी चीनमध्ये जाऊन तेथील मंत्र्यांची भेट घेतली होती. हे करतांना त्यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि चीनमधील भारतीय दूतावास यांना कुठलीही कल्पना दिली नाही. वास्तविक चीन हा आपला क्रमांक एकचा शत्रू आहे. तो वारंवार भारताच्या कुरापती काढत असतो. तो अरुणाचल प्रदेश गिळंकृत करू पहात आहे. पाकच्या माध्यमातून तो भारतात सातत्याने आतंकवाद पसरवत आहे. भारताचा विरोध डावलून तो पाकव्याप्त काश्मीरमधून ‘वन बेल्ट वन रोड’, ‘इकोनॉमिक कॉरिडॉर’ यांसारखे भारतविरोधी प्रकल्प मुद्दाम राबवत आहे. भारताच्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला चीन कायमच विरोध करत आला आहे. तेथे तो भारताच्या विरोधात मतदान करतो. जिहादी आतंकवादी मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘आतंकवादी’ घोषित करण्याच्या भारताच्या मागणीला चीनने सातत्याने विरोध केला आहे. डोकलाम संघर्ष तर चीनच्या कुरापतींचा सर्वाेच्च बिंदु होता. तेथे अजूनही तेथील परिस्थिती पूर्ववत् झालेली नाही. या सर्व भारतविरोधी घटनांच्या पार्श्वभूमीवरही राहुल गांधी यांना चीनमध्ये जाऊन तेथील मंत्र्यांची भेट घ्यावीशी का वाटते ? विशेष म्हणजे ही भेट झाल्याचे एकीकडे काँग्रेस नाकारत होती, तर स्वतः राहुल गांधी हे ही भेट झाल्याची स्वीकृती देत होते. मग ही लपवाछपवी कशासाठी केली गेली ? आताही राहुल गांधी यांनी ब्रिटनमधील ‘लेबर पार्टी’चे माजी खासदार आणि कट्टर भारतद्वेष्टे जेरेमी कॉर्बिन यांची भेट घेतली. कॉर्बिन महाशय काश्मीर भारतापासून तोडण्यासाठी पूर्वीपासून प्रयत्नशील आहेत. अशांची भेट घेण्याने कोणता संदेश जातो ? गांधी यांचे विदेश दौरे म्हणूनच वादग्रस्त ठरतात. गांधी यांची अशांशी मैत्री असेल, तर त्यांनी त्याचा पुनर्विचार करायला हवा. गांधी एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी तेथील जगप्रसिद्ध केंब्रिज विद्यापिठातील एका कार्यक्रमात बोलतांना भारतीय उपखंडात चीनच्या वाढत्या प्रभावाचे समर्थन करत ‘चीनला आसपासच्या देशांची समृद्धी झालेली हवी आहे’, अशा भाषेत चीनची वकिली केली. हे अत्यंत संतापजनक आहे. याच काँग्रेसींचे शशी थरूर, दिग्विजय सिंह आदी नेते अधूनमधून पाकचे गुणगान गात असतात. थोडक्यात भारताच्या मुळावर जे जे देश उठले आहेत, त्या त्या देशांच्या प्रवक्त्यांची एकप्रकारे भूमिका काँग्रेसी नेटाने पार पाडतांना दिसतात. अशा काँग्रेसने सत्तेत असतांना चीन आणि पाक यांच्या संदर्भात कसे निर्णय घेतले असतील, हे यावरून लक्षात येते. अशा पक्षाचे अस्तित्व देशासाठी धोकादायक आहे. त्यामुळे त्याचे राजकीयदृष्ट्या अस्तित्व संपवणे, यातच खरे राष्ट्रहित आहे !