अमेरिकेत गेल्या ५ वर्षांत १०० हून अधिक शाळांमध्ये गोळीबार !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत वर्ष २०२२ मध्ये आतापर्यंत २१२ सामूहिक गोळीबाराच्या घटना घडल्या असून गेल्या ५ वर्षांमध्ये शाळांमध्ये या स्वरूपाच्या १०० हून अधिक घटना घडल्याचे समोर आले आहे. केवळ वर्ष २०२१ मध्येच शाळांमध्ये गोळीबाराच्या ३४ हून अधिक घटना घडल्या. अमेरिकेतील ‘गन वॉयलेंस आर्काइव’ नावाच्या संघटनेने देशात झालेल्या गोळीबाराच्या घटनांवर आधारित एक अहवाल प्रसारित केला आहे. त्यातून वरील माहिती समोर आली. अशा प्रकारचा गोळीबार प्रामुख्याने टेक्सास राज्यातील शाळांमध्ये होत असतो.

अमेरिकेमध्ये गोळीबाराच्या घटना अधिक होण्यामागे एक कारण हे तेथील बंदुकीच्या संदर्भात असलेला शिथिल कायदाही आहे. ‘द गन कंट्रोल अ‍ॅक्ट १९६८’नुसार ‘राइफल’ अथवा अन्य कोणतेही छोटे शस्त्र स्वत:समवेत ठेवण्यासाठी १८ वर्षे वयोमर्यादा असणे, एवढीच अट आहे. तसेच एकाच वेळी २ शस्त्रे समवेत बाळगायची असल्यास २१ वर्षे वयोमर्यादा पुरेशी असते. ३३ कोटी लोकसंख्या असलेल्या अमेरिकी जनतेकडे एकूण ३९ कोटी शस्त्रे आहेत.

संपादकीय भूमिका

स्वत:समवेत शस्त्र बाळगण्याची आवश्यकता भासणे, यातून अमेरिकी जनतेतील असुरक्षिततेचा स्तर किती आहे, हे लक्षात येते ! जगातील सर्वांत प्रगत देशाची हीच का ‘प्रगती’ ?