साम्यवादी आणि सावरकर !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने २१ ते २८ मे २०२२ या कालावधीत प्रतिदिनची लेखमाला…

‘लोकसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र लावण्यावरून साम्यवाद्यांनी (कम्युनिस्टांनी) माजवलेला वादंग आणि काँग्रेसी खासदारांची अनुपस्थिती हे शहाणपणाचे लक्षण निश्चितच नव्हते. अमराठी खासदारांना सावरकरांविषयी असलेली अल्प माहिती समजू शकते; पण दुर्दैवाने महाराष्ट्रातच सुमार बुद्धीचे काही मूठभर तथाकथित ‘बुद्धीमंत’ राजकीय किंवा अन्य काही कारणास्तव सावरकरांविरुद्ध अपसमज निर्माण करतांना दिसतात, तेव्हा कीव येते.

स्वातंत्र्यवीर सावरकर

साम्यवादी नेते सीताराम येचुरींनी सावरकरांविरुद्ध आवाज उठवताच दुसरे साम्यवादी अनिल नौरिया पुढे आले. यानंतर सगळे सावरकरविरोधी सूर आळवू लागले. या सर्व साम्यवाद्यांसाठी वानगीदाखल त्यांचे काही पूर्वजच सावरकरांविषयी काय बोलले, ते पाहूया.

१. मानवेंद्रनाथ रॉय : मोठ्या ब्रिटीश साम्राज्यशाहीशी सावरकर लढत होते, तेव्हा मी शाळकरी मुलगा होतो. त्यांच्या (सावरकरांच्या) जीवनामुळे मला राजकारणात साम्राज्यशाहीशी लढण्याची प्रेरणा मिळाली आणि मी राजकारणात पहिले पाऊल त्यांच्याच मार्गाने टाकले.

२. लालजी पेंडसे : ज्या पिढीने पहिला राजकीय शब्द आपणाकडून (सावरकरांकडून) ऐकला आणि वाचला त्या पिढीच्या वतीने मी आपले स्वागत करतो. आज महाराष्ट्रातील शेकडो तरुण ब्रिटीश साम्राज्यशाही नष्ट करण्यास सिद्ध आहेत.

सावरकर यांच्या निधनानंतरच्या प्रतिक्रिया

१. श्रीपाद अमृत डांगे : वीर सावरकर यांच्या मृत्यूने आपण एक थोर क्रांतीकारक गमावला आहे. ज्यांनी साम्राज्यवादाचा विरोध केला. त्यांच्यामुळे अनेक थोर स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा मिळाली.

२. प्रा. हिरेन मुखर्जी : वीर सावरकर केवळ एक हिंदु महासभेचे नेते म्हणून स्मरणात रहाणार नाहीत, ते राष्ट्रीय नेते होते.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी साम्यवाद्यांनी स्वतःच्या तत्त्वांना तिलांजली देणे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर टीका करून कालांतराने दिलगिरी व्यक्त करणे

सावरकरांविरुद्ध रान उठवणारी साम्यवादी मंडळी स्वातंत्र्यलढ्यात कुठे होती ? दुसऱ्या महायुद्धात हिटलर आणि स्टॅलिन यांचा करार होताच ब्रिटन आणि अमेरिका यांच्या विरुद्ध टीका करणारे हे लोक एका रात्रीत पालटले. आक्रमण न करण्याचा करार मोडून हिटरलने रशियात सैन्य घुसवताच हे हिटलरचे टीकाकार झाले. ब्रिटन, अमेरिका, रशिया यांचा मैत्रीकरार होताच या साम्यवाद्यांचा ब्रिटीश विरोध मावळून गेला. आता सुभाषबाबू यांच्या टीकेचे धनी झाले. नेताजी सुभाषचंद्र बोस जर्मनीहून जपानला आले. आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करू लागले. हे पाहून भारतातल्या साम्यवाद्यांनी त्यांना ‘जर्मन कुत्रा’ आणि ‘जपानी हस्तक’ अशा शेलक्या शिव्या हासडल्या. या अपराधानंतर ५० वर्षांहून अधिक काळ उलटून गेल्यावर परवा-परवा त्यांच्या पक्षाने सुभाषबाबूंविषयी ‘तसे म्हणणे चुकीचे होते’, असे सांगत दिलगिरी दाखवली. कुणी सांगावे, अजून ५० वर्षांनी साम्यवादी शेष राहिलेच, तर तशीच दिलगिरी सावरकरांविषयीही दाखवतील.

खरेतर सावरकर यांच्या विरोधकांची पोटदुखी ही ते अंदमानातून जिवंत सुटून आले हीच असावी. ते अंदमानातच मेले असते, तर हिंदुत्ववाद इत्यादी भानगड उद्भवली नसती आणि त्यांचे अन् काँग्रेसी नेत्यांचे दात घशात घालणारा माणूस उरला नसता; पण तसे झाले नाही. हाच राग असावा, दुसरे काय ?’

– डॉ. सच्चिदानंद सुरेश शेवडे

(साभार : ‘आणि सावरकर’ या पुस्तकातून)