अनमोल ग्रंथनिर्मात्या परम पूज्यांना करतो मी त्रिवार वंदन ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेले अनमोल ग्रंथ हा माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे. मी गेल्या ३३ वर्षांपासून परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहे. त्यांची महान ग्रंथसंपदा, म्हणजे ‘साधना करणे आणि आनंदी जीवन जगणे’, यांसाठी माझ्यासारख्या लाखो साधकांचा आधारस्तंभ आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी एप्रिल २०२२ पर्यंत ३५४ ग्रंथांची निर्मिती केली आहे, तसेच त्यांनी ५ सहस्र ग्रंथ निर्माण होतील, एवढे लिखाण सिद्ध केले आहे. साधना करत असतांना मी सनातनच्या सहस्रो साधकांच्या संपर्कात आलो. त्या वेळी मला प्रत्येक साधकाकडून शिकता आले. काही साधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मी लिहू शकलो. यावरून ‘सनातनचे हितचिंतक, साधक, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु, हे परात्पर गुरु डॉक्टरांनी घडवलेले चालते-बोलते ग्रंथच आहेत’, याची मला अनुभूती येते. असे शेकडो चालते-बोलते ग्रंथ निर्माण करणाऱ्या व्यासमुनींसम परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी मी ही कवितापुष्पाची पाकळी वहातो.

पू. शिवाजी वटकर

परम पूज्यांनी ग्रंथ लिहिले महान ।
ग्रंथ वाचूनी दूर पळेल हो तुमचे अज्ञान ।। १ ।।

परम पूज्यांचे ग्रंथ असती चैतन्याची खाण ।
ग्रंथांमुळे नष्ट होते वाईट शक्तीचे आवरण ।। २ ।।

परम पूज्यांनी ग्रंथ लिहिले सात्त्विक छान ।
भागेल जिज्ञासू, साधक अन् मुमुक्षू यांची तहान ।। ३ ।।

परम पूज्यांचे ग्रंथ असती मूल्यवान ।
ग्रंथ वाचूनी दूर जाते निराशा अन् अज्ञान ।। ४ ।।

ग्रंथ वाचूनी माणूस होईल नीतीवान ।
ग्रंथ वाचूनी होईल जीवनाचे कल्याण ।। ५ ।।

साधकरूपी चालते-बोलते ग्रंथ घडवले महान ।
या ग्रंथांना नसे वय, लिंग अन् वर्ण यांचे बंधन ।। ६ ।।

परम पूज्यांनी ग्रंथ लिहिले लहान-लहान (टीप १) ।
ग्रंथांतून मिळेल जगण्याचे तत्त्वज्ञान ।। ७ ।।

ग्रंथ वाचूनी वाचक होतील चारित्र्यवान ।
ग्रंथांच्या वाचनाने होते हो अमृतपान ।। ८ ।।

ग्रंथाने होईल आपोआप नामस्मरण ।
लोक करतील आवडीने धर्माचरण ।। ९ ।।

ग्रंथाने साधेल भगवंताचे अनुसंधान ।
ग्रंथ करून देतील भगवंताचे स्मरण ।। १० ।।

ग्रंथ करतात तात्त्विक अन् प्रायोगिक भागाचे विवेचन ।
ग्रंथांतील ज्ञानसाधनेने मिळेल मुक्तीचे दान ।। ११ ।।

ग्रंथांच्या वाचनाने जागेल हो धर्माभिमान ।
ग्रंथांच्या अभ्यासाने वाढेल हो राष्ट्राभिमान ।। १२ ।।

ग्रंथ देती श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेची आठवण ।
ग्रंथांच्या अभ्यासाने होईल पाचव्या वेदाचे (टीप २) पठण ।। १३ ।।

ग्रंथ असती ज्ञान, क्रिया अन् इच्छा शक्तीचे संकलन ।
ते असती परम पूज्यांचे अनमोल अन् अनुभवसिद्ध विचारधन ।। १४ ।।

ग्रंथ करती ब्राह्मतेज अन् क्षात्रतेज यांचे प्रक्षेपण ।
दीपस्तंभ होऊनी करतात ते समाजाला दिशादर्शन ।। १५ ।।

ग्रंथांच्या वाचनाने होतील लोक बलवान ।
ग्रंथांच्या चैतन्याने येईल हिंदु राष्ट्र महान ।। १६ ।।

लोकहो करा तुम्ही नित्य ग्रंथाचे परिशीलन (टीप ३) ।
ग्रंथांच्या आचरणाने होईल तुमचे परिपालन ।। १७ ।।

ग्रंथ अंगीकारल्यावर नसेल कशाचीच वाण ।
परात्पर गुरूंपुढे सदा झुकवतो मी माझी मान ।। १८ ।।

हिंदूंनो, गीतेसम ग्रंथांच्या अभ्यासाचे लावावे बंधन ।
अनमोल ग्रंथनिर्मात्या परम पूज्यांना करतो मी त्रिवार वंदन ।। १९ ।।

टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांना एखाद्या विषयावर एकच मोठा ग्रंथ लिहिण्याऐवजी २ – ३ लहान-लहान ग्रंथ लिहिण्यास सांगितले होते.

टीप २ – संतांनी सनातनच्या ग्रंथांना ‘कलियुगातील पाचवा वेद’, असे म्हटले आहे.

टीप ३ – मनन आणि चिंतन

– (पू.) शिवाजी वटकर (वय ७५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.५.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक