कृती ऐशी मधुर घडली । तिने सद्गुरुपदाला गौरवांकित केले ।।

१७ सप्टेंबर २०२० या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाढदिवसानिमित्त साधकांनी कृतज्ञताभावात राहून काही भावपुष्पे त्यांच्या मंगल चरणी समर्पित केली होती. तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी माथा ठेवून साधकांकडे आशीर्वाद मागितले. मी ते विलोभनीय दृश्य केवळ वाचले नाही, तर ‘त्या कार्यस्थळी राहून प्रत्यक्ष अनुभवत आहे’, असे मला वाटले. ‘त्याविषयी काहीतरी लिहावे’, असे आतून वाटले; म्हणून ही भावपुष्पे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या पवित्र चरणी आणि त्यांना घडवणाऱ्या परात्पर गुरुदेवांच्या कोमल चरणी शरणागतीने समर्पित !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

कृती ऐशी मधुर घडली । तिने सद्गुरुपदाला गौरवांकित केले ।। धृ. ।।
त्या चाणाक्ष रत्नपारख्याचे । मला भरभरून कौतुक वाटले ।। १ ।।

कृती ऐशी मधुर घडली । ती भूमाताही क्षणभर थरथरली ।
त्या अकल्पित कृतीने । ती भूमाताही मनोमन भारावून गेली ।
डोळ्यांत साठलेल्या भावाश्रूंना । तिने हलकेच हृदयात लपविले ।। २ ।।

कृती ऐशी मधुर घडली । त्या सद्गुरुपदाला जणू नवी आभूषणे प्राप्त झाली ।
सदैव निर्गुण स्थित असलेल्या गुरुदेवांनी । सगुण स्थितीत येऊन ।
ते नयनमनोहर दृश्य नेत्रांत साठविले ।। ३ ।।

कृती ऐशी मधुर घडली । साधकही क्षणभर भांबावून गेले ।
क्षणात सावध होऊनी । आपल्या अहंशून्यतेला ।
शरणागतीने प्रणिपात करते झाले ।। ४ ।।

कृती ऐशी मधुर घडली । सर्व सृष्टीही अचंबित झाली ।
त्या सृष्टीनेही काही क्षणासाठी । ते दृश्य टिपण्यासाठी ।
जणू आपले सृष्टीचक्रही । काही क्षणांसाठी थांबवले, असा भास झाला ।। ५ ।।

वाढदिवस सद्गुरु माऊलीचा । त्याने काय काय लीला केल्या ।
लीला करणारा तो लीलाधर । मात्र हलकेच खुदकन गालात हसला ।। ६ ।।

त्या प्रसंगाचे वर्णन करतांना । लेखणी थांबू नये, असे वाटते ।
परंतु कालगती ओळखून । भावाला विवेकाचे बंधन घालून ।
अंती थांबावे लागते ।। ७ ।।

नमन करतो त्या सद्गुरुपदाला । आणि भावविभोर कृतीने ।
त्यांचा सन्मान करणाऱ्या सद्गुरु माऊलीला । आणि अशी सद्गुरु माऊली आम्हास दिली
म्हणून त्या सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप । अनंत ब्रह्मांडाचा नायक असलेल्या परात्पर गुरु माऊलीला ।। ८ ।।

(देव आधी कवितेचा मथळा सुचवतो आणि नंतर त्याप्रमाणे कविता रचून (साकारून) घेतो.)

– श्री. संजय घाटगे, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर. (२१.९.२०२०)