घरी किंवा स्थानिक ठिकाणी नमाजपठण करावे ! – अंजुमन इंतजामिया मशीद कमिटीचे आवाहन

ज्ञानवापी मशिदीमध्ये शुक्रवारच्या नमाजासाठी मोठी गर्दी

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ज्ञानवापी मशिदीमधील वजूखान्यामध्ये (नमाजापूर्वी हात-पाय धुण्याची जागा) शिवलिंग सापडल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर हा भाग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मशिदीमध्ये नमाजपठणासाठी येणार्‍या लोकांना हात-पाय धुण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यासाठी न्यायालयाकडे मागणी करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवार, २० मे या दिवशी मोठ्या संख्येने मुसलमान येथे नमाजपठणाला आले असता अंजुमन इंतजामिया मशीद कमिटीने ‘वजूखाना आणि शौचालय बंद करण्यात आल्याने लोकांनी मशिदीत अधिक गर्दी करू नये’, असे आवाहन केले. कमिटीने आदल्या दिवशीच याविषयीचे पत्र जारी केले होते; मात्र तरीही गर्दी झाली होती. मशिदीमध्ये एकाच वेळी साधारण १ सहस्र लोकच नमाजपठण करू शकतात, असे सांगितले जाते. येथे पिंपांमध्ये पाणी भरून तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती.