श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची सर्वव्यापक गुरुतत्त्वाशी असलेली एकरूपता !

‘काही दिवसांपासून मी माझा अहं न्यून करण्याचा एक प्रयत्न म्हणून सकाळी उठल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले आणि दोन्ही सद्गुरुद्वयी, म्हणजे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची मानसपूजा करते. मानसपूजा करतांना मी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या बाजूला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि डाव्या बाजूला श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू उभ्या आहेत’, असे दृश्य डोळ्यांसमोर ठेवते. मला प्रतिदिन सद्गुरु बिंदाताईंची आठवण येते आणि देवाच्या या कृपेसाठी मला पुष्कळ कृतज्ञता वाटते. काल मला सद्गुरु सिरियाक वाले यांचा सत्संग लाभला. सत्संगाच्या शेवटी आम्ही दोघे ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्व साधकांना आध्यात्मिकदृष्टीने कसे घडवले आहे’, याच्या पूर्वस्मृतींना कृतज्ञतापूर्वक उजाळा दिला. त्या वेळी माझ्या मनात ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी सद्गुरु बिंदाताई आणि सद्गुरु गाडगीळकाकू यांच्या संदर्भात हे घडवणे वेगळे आहे’, असा विचार आला. आम्हा सर्व साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांनी एका दैवी साच्यात, म्हणजे व्यष्टी आणि समष्टी यांच्या अनुषंगाने आवश्यक गुण देऊन घडवले आहे. सद्गुरु बिंदाताई आणि सद्गुरु गाडगीळकाकू यांना मात्र त्यांनी (परात्पर गुरु डॉक्टरांनी) दैवी साच्याच्याही पुढे जाऊन असे घडवले आहे की, त्या दोघींमध्ये देवीतत्त्वच प्रगट झाले आहे. त्या वेळी उत्स्फूर्तपणे माझ्याकडून सद्गुरु बिंदाताई आणि सद्गुरु गाडगीळकाकू यांचा तुलनात्मक अभ्यास झाला. ‘सद्गुरु गाडगीळकाकूंचे बोलणे आणि आचरण प.पू. भक्तराज महाराज यांच्याप्रमाणे सहज अन् आनंददायी असते. त्यांची व्यष्टी आणि समष्टी प्रकृती असून त्या प.पू. भक्तराज महाराज यांच्यातील गुरुतत्त्वाशी एकरूप होत आहेत. सद्गुरु बिंदाताईंचे बोलणे आणि आचरण परात्पर गुरु डॉक्टरांप्रमाणे परिपूर्ण अन् चैतन्यदायी असते. त्यांची पूर्णतः समष्टी प्रकृती असून त्या परात्पर गुरु डॉक्टरांमधील गुरुतत्त्वाशी एकरूप होत आहेत.’

– (पू.) सौ. भावना शिंदे, शॅम्पेन, अमेरिका. (१७.६.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक