मुंबई येथे नौदलाच्या उदयगिरी आणि सुरत या युद्धनौकांचे जलावतरण !

युद्धनौका अत्याधुनिक मिसाईल आणि आयुधे यांनी सिद्ध 

मुंबई, १७ मे (वार्ता.) – भारतीय नौदलासाठी ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ या जहाजबांधणी कारखान्यात बांधण्यात आलेली विशाखापट्टणम् श्रेणीतील अखेरची विनाशिका ‘सुरत’ आणि निलगिरी श्रेणीतील फ्रिगेट्स ‘उदयगिरी’चे जलावतरण झाले. एकाच वेळी २ युद्धनौकांचे जलावतरण होण्याची ही अलीकडील काळातील पहिलीच घटना आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

 (सौजन्य : Hindustan Times)

ही विनाशिका नौदलाच्या ताफ्यात भरती झाल्यावर तिचे नामकरण ‘आयएन्एस् सुरत’ असे होणार आहे, तर निलगिरी श्रेणीतील दुसऱ्या फ्रिगेट्सचे नामकरण ‘आयएन्एस् उदयगिरी’ असे असेल. नौदलाच्या परंपरेनुसार जलावतरण नेहमी महिलेच्या हस्ते केले जाते. त्यामुळे या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री राजनाथसिंह प्रमुख अतिथी असले, तरी ‘सुरत’चे जलावतरण पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल ए.बी. सिंह यांच्या पत्नी चारू सिंह यांच्या हस्ते झाले, तर ‘उदयगिरी’चे जलावतरण ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नारायण प्रसाद यांच्या पत्नी जयश्री प्रसाद यांच्या हस्ते झाले. दोन्ही युद्धनौका अत्याधुनिक मिसाईल आणि आयुधे यांनी सिद्ध असून त्या शत्रूच्या रडारच्या कक्षेत येणार नाहीत.