‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग- २)’ या ग्रंथाचे प्रकाशन !

प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीच्या वास्तूला १ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कांदळी (जिल्हा पुणे) येथे सोहळा साजरा !

ग्रंथाचे मुखपृष्ठ

कांदळी (जिल्हा पुणे) – येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीच्या वास्तूला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १६ मे या दिवशी ‘वास्तू वर्धापनदिना’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प.पू. भक्तराज महाराजांची समाधी आणि पादुका यांची सकाळी १० ते ११.३० या वेळेत अभिषेक करून पूजा करण्यात आली. त्यानंतर प.पू. भक्तराज महाराजरचित चैतन्यमय भजनांचा कार्यक्रम झाला. या प्रसंगी प.पू. भक्तराज महाराजांच्या पत्नी प.पू. जीजी, पुत्र पू. नंदूदादा कसरेकर आणि भक्त श्री. शशीकांत ठुसेकाका यांच्या हस्ते ‘प.पू भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग- २)’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

ग्रंथाचे लेखक कै. चंद्रकांत (दादा) दळवी हे असून त्यांच्या कन्या सौ. उल्का नितीन बगवाडकर या साहाय्यक लेखिका आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला प.पू. भक्तराज महाराज यांचे पुत्र श्री. रवींद्र कसरेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

ग्रंथाचे प्रकाशन करतांना डावीकडून पू. नंदूदादा, प.पू. जीजी आणि श्री. शशिकांत ठुसे

प.पू. बाबांची भजने ऐकून भक्तांचा भाव जागृत होतो ! – सौ. उल्का बगवाडकर

ग्रंथाच्या लेखिका सौ. उल्का नितीन बगवाडकर मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या, ‘‘या ग्रंथाच्या प्रथम भागाचे प्रकाशन गुरुपौर्णिमेच्या दिवशी प.पू. बाबांच्या समाधीस्थळी प.पू. जीजी यांच्या हस्ते वर्ष २०२१ मध्ये झाले होते. आज ग्रंथाच्या द्वितीय भागाचे प्रकाशनही येथेच प.पू. जीजींच्याच हस्ते होत आहे. हा प.पू. बाबांचा आशीर्वादच आहे. प.पू. बाबांची भजने भावपूर्ण आहेत, त्यातून भक्तांना मार्गदर्शन मिळते. प.पू. बाबांची भजने ऐकून भक्तांचा भाव जागृत होतो.’’

प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्या साहाय्याविना ग्रंथ प्रकाशित करणे शक्यच नव्हते ! – सौ. बगवाडकर

सौ. बगवाडकर म्हणाल्या, ‘‘या ग्रंथाच्या लिखाणासंदर्भात माझा सनातन संस्थेशी संपर्क झाला. त्या वेळी मला एक गोष्ट जाणवली की, सनातनचे साधक पुष्कळ शिस्तबद्ध सेवा करतात. हे भजनाचे पुस्तक प्रसिद्ध करतांना साधकांनी पुष्कळ चिकित्सा करून भजनांचे अभ्यासपूर्ण भावार्थ शोधले आहेत. सर्वांनी ग्रंथ प्रकाशनासाठी पुष्कळ साहाय्य केले आहे. सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्या साहाय्याविना ग्रंथ प्रकाशित करणे शक्यच नव्हते. या ग्रंथाच्या साहाय्याने प.पू. बाबांच्या भजनांचा भावार्थ उलगडण्यासाठी नक्कीच साहाय्य होईल.’’