असा हा अमुचा श्रीरंग ।

संत एकनाथ महाराज यांनी श्रीकृष्णावर अनेक गौळणी लिहिल्या आहेत. ‘परात्पर गुरु डॉक्टरांवरही तसे लिहायला हवे’, असा माझ्या मनात विचार आला आणि त्यानंतर मला पुढील कविता सुचली. श्रीरंगा (परात्पर गुरु डॉक्टर), तुमच्या चरणी ही कविता अर्पण करते आणि त्या आधी कवितेतील अपूर्णतेसाठी क्षमा मागते. ‘पादपद्यमे मी ठेवा निरंतर’ (मला आपल्या चरणकमली निरंतर ठेवा) हीच प्रार्थना !’

सौ. शालिनी मराठे

रंगात रंगला श्रीरंग ।
असा गं बाई, अमुचा हा श्रीरंग (टीप १) ।। धृ. ।।

शंकानिरसन अवघड खेळ ।
जमवून अवघा साधक मेळ ।
घडवितो परमात्म्याशी संग ।
असा हा अमुचा श्रीरंग ।। १ ।।

शंकानिरसन, स्वभावदोष अन् अहं यांचे नवीन प्रांगण ।
षड्रिपूंना हा लावी पळवून ।
स्वयंसूचना अस्त्र फेकता स्वभावदोष पळती जंग-जंग (टीप २)।
असा हा अमुचा श्रीरंग ।। २ ।।

स्थापिले महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय ।
निर्मिले पंचम वेद ग्रंथालय ।
शिकवले धर्माचे (टीप ३) प्रायोगिक अंग ।
असा हा अमुचा श्रीरंग ।। ३ ।।

व्हावी जिवांना ईश्वरप्राप्ती ।
त्यासाठीच ‘गुरुकृपायोग’ निर्मिती ।।

‘धर्मसंस्थापना’ हाच असे पाया ‘रास-रंग’ ।
असा हा अमुचा श्रीरंग ।। ४ ।।

कुणी म्हणती हा गुरुवर ईश्वर ।
कुणी म्हणती हा श्रीविष्णु चक्रधर ।
तरीही राही हा शिष्यभावातच दंग ।
असा हा अमुचा श्रीरंग ।। ५ ।।

आनंद अन् चैतन्य यांची उधळण करतो ।
प्रीतीने तो भावभक्ती अन् कृतज्ञता यांची फुले फुलवितो ।
जीवनी आमच्या भरला याने अध्यात्माचा रंग ।
असा गं बाई, अमुचा हा श्रीरंग ।। ६ ।।

टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले

टीप २ – युद्धभूमीत शत्रू वाट फुटेल, तिकडे रानोमाळ पळतात.

टीप ३ – सनातन धर्म (हिंदु धर्म)

– गुरुचरणी शरणागत,

सौ. शालिनी प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.३.२०२२)


कवितेचे टंकलेखन करतांना भाव जागृत होऊन गुरुदेवांना प्रार्थना होणे

‘ही कविता टंकलेखन करतांना माझा भाव जागृत झाला. मला गुरुदेवांची पुष्कळ आठवण होऊन माझ्याकडून सूक्ष्मातून त्यांच्या चरणांवर फुले अर्पण केली गेली आणि ‘गुरुदेवा, तुमच्या चरणांपासून या पामराला दूर लोटू नका’, अशी प्रार्थना झाली.’

– श्रीमती शर्मिला पळणीटकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.४.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक