गोव्यातील मंदिरे, ग्रंथ यांचा नाश होण्यासह भारतीय भाषांना विरोध होणे

हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…

गोव्याच्या मुक्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसेनानींपैकी एक डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा म्हणजेच डॉ. टी.बी. कुन्हा यांना गोमंतकाच्या ‘आधुनिक स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक’ म्हणून ओळखले जाते. डॉ. टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण कसे झाले आहे ?’, याचा साद्यंत इतिहास त्यांच्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकातून मांडला आहे. १६ मे या दिवशी आपण ‘इन्क्विझिशनमुळे गोव्याच्या संस्कृतीचा झालेला नाश’, यांविषयी वाचले. आज त्यापुढील भाग येथे देत आहोत.

१७. हिंदूची मंदिरे उद्ध्वस्त करणे

‘गोव्यात राहिलेला पोर्तुगीज इतिहासकार कुन्हा रिव्हारा आपल्या देशबांधवांच्या तिरस्करणीय कृतीविषयी प्रांजळपणे लिहितो, ‘जिंकायच्या पहिल्या कैफात, देवळे उद्ध्वस्त केली गेली. मूर्तीपूजेची सगळी चिन्हे तोडून चक्काचूर केला गेला. स्थानिक भाषेतली पुस्तके दोषी ठरवून किंवा मूर्तीपूजेची शिकवण असल्याच्या संशयाने ती जाळून टाकली. लगेच धर्मांतरित न झालेल्या लोकांनाही नाहीसं करण्याची इच्छा होती आणि ही हाव केवळ त्या काळापुरतीच नव्हती, तर दोन शतकांनंतरही स्वतःला मुत्सद्दी समजणाऱ्या काही लोकांनी सरकारला तसाच सल्ला दिला…..’  (पृष्ठ क्र. ४३)

१८. भारतीय भाषांना विरोध म्हणून पुस्तके जाळणे

डॉ. टी.बी. कुन्हा

‘सांस्कृतिक दिवाळखोरीचं मुख्य कारण म्हणजे भाषांचा, विशेषतः कोकणी आणि मराठी यांचा पोर्तुगिजांनी रानटीपणाने केलेला छळ अन् पोर्तुगीज भाषेची सक्ती. गोवा काबिज केल्यावर ही बंदी चालू झाली. मातृभाषेचा विकास होऊ नये म्हणून शक्य तितक्या बाधा आणल्या गेल्या आणि सर्वार्थाने विदेशी असणारी भाषा आत्मसात करावी; म्हणून सर्व उपाय लादले गेले. कुन्हा रिव्हारने प्रमाण दिल्याप्रमाणे, प्रारंभीच स्थानिक भाषेतली सगळी पुस्तके नष्ट केली गेली. १५४८ मध्येसुद्धा बिशप फादर जुआव द् आल्बुकर्कने स्थानिक भाषेतली पुस्तके नष्ट करण्याकरता गोळा केली होती. अशा गोष्टींचा विध्वंस करून भाषेचे उच्चाटन करण्यात यश येत नाही. उलट राज्यकर्त्यांना लोकांशी व्यवहार करायचे माध्यम उरले नाही, हे पाहून काही युरोपियन पाद्री संस्कृत आणि मराठीच्या आधारे कोकणी शिकू लागले. त्यांनी कॅटॅकीजम धेडगुजरी भाषेत छापले. त्यावरून जेजुईटांनी आमच्या भाषेचा विकास आणि प्रचार केला, अशी चुकीची कल्पना करून दिली जाते; पण त्यांनी ते स्वतःच्या लाभाकरताच केले आणि त्यांच्या आधीच्या लोकांनी विध्वंस केल्यामुळे त्यांना असे करावे लागले. सासष्टीमध्ये जेजुईटांचे राज्य होते; दुसऱ्या धार्मिक संस्थांचा प्रभाव असलेल्या इतर कुठल्याही प्रदेशापेक्षा सासष्टीतील कोकणी अशुद्ध वाटते. अस्सल आणि प्रचलित भाषेशी फारसा परिचय नसतांना त्यांनी लिहिलेली पुस्तकेच भाषेच्या अशुद्धीकरणाला जबाबदार आहेत.’ (पृष्ठ क्र. ४३)

१९. भारतीय भाषेविरुद्ध तीव्र्र विरोध करणे

‘१७ व्या शतकाच्या प्रारंभीला, सर्रास बाप्टीझमच्या पद्धतीमुळे कोेकणी भाषा शिकण्याच्या कटकटीतून (पोर्तुगीज) पाद्रींची मुक्तता झाली. उलट त्या भाषेविरुद्ध त्यांच्यात तीव्र विरोध निर्माण झाला. आर्चबिशप डॉन सबास्टिन द् पेद्रूने १६२७ मध्ये सांगितले की, स्थानिक भाषा शिकायची ते (पोर्तुगीज पाद्री) तसदी घेत नाहीत. त्याने हिंदी पाद्री नियुक्त करण्याची धमकी दिली. तेव्हा १३ डिसेंबर १६२९ रोजी फ्रान्सिस्कननी त्याला उत्तर दिले, ‘‘स्थानिक पाद्री कान टोचलेले असतात. स्वतःला आणि आपल्या नातेवाइकांना मालमत्ता कशी मिळेल, एवढेच ते पहातात. त्यामुळे त्यांना मान मिळत नाही.’’ आन्तोनियो द् मेल काश्तरो या व्हॉईसरॉयने राजाकडे तक्रार केली की, जेजुईट, डॉमिनिकन आणि आगुस्टीनियन हे कोकणी भाषा शिकायला नकार देतात.’ (पृष्ठ ४३-४४)

(संपन्न ‘पॅरीश’ आणि तिथं मिळणारं एैषोआरामी जीवन गमावून, भाषेच्या अज्ञानामुळे ते स्थानिक पाद्रींना द्यावे लागेल, या भीतीने युरोपियन मिशनऱ्यांनी २७ जून १६२९ या दिवशी व्हॉईसरॉय फ्रान्सिस्कू द् ताव्हेरा, काऊंट ऑफ आल्व्हर, यांच्याकडून आदेश मिळवला.)

(लेखातील दिलेले पृष्ठ क्रमांक ‘गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास’ या पुस्तकातील आहेत. इंग्रजी लेखक : डॉ. टी.बी. कुन्हा, अनुवादक : प्रफुल्ल गायतोंडे)