अमेरिकाकेंद्रीत जग इतिहासजमा होईल ! – रशिया

रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव

मॉस्को (रशिया) – आंतरराष्ट्रीय संबंधांविषयी पाश्‍चात्त्य देशांच्या विचारसरणीत स्वार्थ दडला आहे. त्यामुळे पाश्‍चात्त्य देशांचे एकमेकांतील संबंध ताणले जातील आणि लवकरच अमेरिकाकेंद्रीत जग इतिहासजमा होईल, अशी चेतावणी रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी येथे केले. मेदवेदेव हे वर्ष २००८ ते २०१२ या कालावधीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते. सध्या ते रशियाच्या संरक्षण परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. अमेरिकाकेंद्रीत जगाच्या अस्तानंतर एका नव्या जागतिक संरक्षणात्मक यंत्रणेचा उदय होईल, असे भाकितही मेदवेदेव यांनी वर्तवले.

भविष्यात जगाला अनेक समस्या भेडसावू शकतात !

मेदवेदेव पुढे म्हणाले की,

१. युक्रेनविरोधात युद्ध पुकारून त्याच्यावर सैनिकी कारवाई केल्याने रशियाच्या विरोधात जागतिक महाशक्तींनी अनेक निर्बंध लादले आहेत. यामुळे जगाचे एकूण स्वरूप पालटेल.

२. रशियावर लादण्यात आलेले निर्बंध केवळ रशियालाच नव्हे, तर ते घातलेल्या राष्ट्रांसह संपूर्ण जगाला मारक ठरतील.

३. विविध उत्पादनांच्या जागतिक साखळ्या कोलमडल्याने व्यापार आणि दळणवळण यांमध्ये अडचणी येत आहेत.

४. अनेक पाश्‍चात्त्य विमान आस्थापनांवरही आता रशियाचे हवाईक्षेत्र वापरण्यावर मज्जाव असल्याने त्यांनाही विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

५. अनेक देशांना ऊर्जा क्षेत्रातील संकटाला तोंड द्यावे लागत आहे. हे संकट अधिक भयावह होत जाईल.

६. आतंरराष्ट्रीय स्तरावर अन्नाचा तुटवडा निर्माण होऊन दुष्काळ पडण्याची पाळी काही राष्ट्रांवर येईल.

७. राष्ट्रीय चलनांची अस्थिरता, भयावह महागाई आणि खासगी मालमत्तेला मिळत असलेले कायद्याचे संरक्षण नष्ट झाल्याने अनेक देश अथवा खंड यांना आर्थिक संकटातून जावे लागेल.

८. ज्या क्षेत्रांतील संघर्षांवर अनेक दशकांपासून कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नाही, अशा क्षेत्रीय संघर्षांना ऊत येऊ शकतो. पाश्‍चात्त्य शक्तींचे सर्व लक्ष रशियाकडे असल्याने अशा क्षेत्रांमधील आतंकवादी तोंड वर काढू शकतात.

९. रशिया-युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यात निष्प्रभ ठरलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचा क्षय होऊ शकतो. युरोपीयन परिषद, ही त्यातीलच एक असेल, असेही मेदवेदेव म्हणाले.