तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाला अटक !

भाजपच्या खासदाराच्या घरावर आक्रमण केल्याचे प्रकरण

नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील जगदल येथून तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाला अटक केली. गेल्यावर्षी सप्टेंबर मासात काही लोकांनी येथील भाजपचे लोकसभेतील खासदार अर्जुन सिंह यांच्या घराजवळ ४५ बाँब ठेवले होते. त्या वेळी त्यांच्या घरावर ३ देशी बाँबद्वारे आक्रमण करण्यात आले होते. याचे अन्वेषण करत असतांना आरोपी नमित सिंह याला अटक करण्यात आली असून तो जगदल नगरपालिका येथील तृणमूल काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता सिंह यांचा मुलगा आहे.

जगदलचे तृणमूल काँग्रेसचे आमदार सोमनाथ श्याम यांनी आरोप केला आहे की, ‘एन्.आय.ए.’ अर्जुन सिंह यांच्या सांगण्यावरून काम करत आहे. आम्ही याला न्यायालयात उत्तर देऊ.’ दुसरीकडे सिंह यांनी त्यांच्यावर करण्यात आलेला आरोप फेटाळून लावला आहे. मे मासाच्या आरंभी या प्रकरणाचे अन्वेषण स्थानिक पोलिसांकडून  एन्.आय.ए.कडे सोपवण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

बंगालच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते बाँब बनवण्यापासून हत्या करण्यासारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे वेळोवळी सिद्ध झाले आहे. असे राजकीय पक्ष एका मोठ्या राज्यावर राज्य करतात, ही भारतीय लोकशाहीची थट्टा नव्हे, तर काय ? अशा पक्षावर बंदी घातली पाहिजे !