पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा, अकबरुद्दीन ओवैसी यांना औरंगजेबाकडे पाठवतो ! – भाजपचे आमदार नितेश राणे

मुंबई – पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा, या ओवैसीला औरंगजेबाकडे नाही पाठवला, तर आम्ही शिवरायांचे मावळे नाही, अशी चेतावणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी १३ मे या दिवशी ट्वीट करून दिली आहे. अजान आणि हुनमान चालिसावरून महाराष्ट्रात सध्या राजकारण तापलेले असतांना ‘एम्.आय.एम्.’चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी औरंगजेबच्या कबरीवर जाऊन नतमस्तक झाले. त्यासमवेत ओवैसी यांनी त्यांच्या भाषणात राज ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. या टीकेला भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करून वरील उत्तर दिले आहे. अकबरुद्दीन ओवैसी यांच्या भाषणानंतर राज्य सरकारने कुठलेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे नितेश राणे यांनी सरकारवर टीका केली आहे.

खासदार संजय राऊत यांची ओवैसी यांना चेतावणी “तुम्हालाही एक दिवस त्याच कबरीमध्ये जावे लागेल !”

आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर टीका करतांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, ‘‘वारंवार औरंगाबादला यायचे, औरंगजेबाच्या कबरी पुढे आम्हाला डिवचण्यासाठी गुडघे टेकायचे. यावरून महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची, असे ओवैसी बंधूंचे राजकारण दिसत आहे. ज्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली आहे. तुम्ही त्या कबरीवर येऊन नमस्कार करता. तुम्हाला एक दिवस त्याच कबरीमध्ये जावे लागेल’’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.