Eknath Shinde : उद्योगक्षेत्रात महाराष्ट्राला आम्ही पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणले ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – महाविकास आघाडीच्या काळात उद्योगक्षेत्रात महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर होता. महायुतीचे शासन आल्यावर सवा वर्षांच्या कालावधीत उद्योगक्षेत्रात महाराष्ट्राला आम्ही पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणले आहे. राज्याच्या विकासात महाराष्ट्रानंतर गुजरात आणि कर्नाटक यांचा क्रमांक लागतो, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ ऑक्टोबर या दिवशी महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केले. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मेट्रो प्रकल्प, समृद्धी महामार्ग, अटल सेतू आदी प्रकल्पांना स्थगिती दिली होती. महायुतीचे शासन आल्यावर आम्ही हे प्रकल्प कार्यान्वित केले.

मेट्रो आणि कारशेड यांच्या प्रकल्पाला विलंब झाल्यामुळे राज्याची १७ सहस्र कोटी रुपयांची हानी झाली. महाविकास आघाडीच्या काळात विकासाची गती रोखली गेली. आमच्या सरकारने उद्योजकांना महाराष्ट्रात येण्याचे आवाहन केले. आमच्या शासनकाळात उद्योग नक्षलग्रस्त गडचिरोलीपर्यंत पोचले. ‘सेमी कंडक्टर’ सिद्ध करण्यासारखे प्रकल्प आमच्या काळात चालू झाले. राज्याच्या कोणत्याही दुर्गम भागात ७-८ घंट्यांमध्ये पोचता येईल, असे रस्त्याचे जाळे आम्ही निर्माण केले आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे विरोधकांना पोटदुखी झाली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील २ कोटी ५० लाख जणांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले होते. त्यांतील २ कोटी ३० लाख महिलांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत.’’