Consumer Court Fined IRCTC : रेल्‍वेगाडी ३ घंटे उशिराने धावल्‍याने रेल्‍वेला ७ सहस्र रुपयांचा दंड !

प्रवाशाने ग्राहक तक्रार मंचाकडे केली होती तक्रार

जबलपूर (मध्‍यप्रदेश) – येथील अरुण कुमार जैन ११ मार्च २०२२ या दिवशी देहली येथे जाण्‍यासाठी हजरत निजामुद्दीन या रेल्‍वेगाडीने प्रवास करत होते; परंतु त्‍यांना रेल्‍वे ३ घंटे उशिराने धावत असल्‍यामुळे योग्‍य वेळी देहली येथे पोचणे शक्‍य झाले नाही. रेल्‍वेच्‍या गलथान कारभाराच्‍या विरोधात जैन यांनी ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रार केल्‍यावर मंचाने रेल्‍वेला ७ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला. यामध्‍ये ८०३ रुपये ६० पैसे हे तिकिटाचे पैसे जैन यांना परत मिळाले. तसेच ५ सहस्र रुपये मानसिक त्रास झाल्‍यासाठी, तर खटल्‍यासाठी लागलेला खर्च म्‍हणून २ सहस्र रुपये, असे पैसे जैन यांना देण्‍याचा आदेश दिला. रेल्‍वेने ४५ दिवसांच्‍या आत हा दंड दिला नाही, तर वार्षिक ९ टक्‍के व्‍याजाने रक्‍कम रेल्‍वेला भरावी लागणार आहे.

संपादकीय भूमिका

देशात प्रतिदिन शेकडो रेल्‍वेगाड्या उशिराने धावत असल्‍याचा अनुभव प्रवाशांना येत असतो. त्‍यामुळे प्रत्‍येक प्रवाशाने अशा प्रकारे तक्रार करणे आवश्‍यक आहे. त्‍यातून तरी रेल्‍वे प्रशासनाला जाग येईल आणि गाड्या वेळेवर धावू लागतील !