|
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल्ला कुटुंबियांना विचारूनच काश्मीरमधून कलम ३७० हटवले होते, असा दावा अवामी इत्तेहाद पक्षाचे प्रमुख खासदार इंजिनिअर राशिद यांनी गंभीर केला. भाजपने ‘नॅशनल कॉन्फरन्स’ पक्षाला साहाय्य केल्यानेच काश्मीर खोर्यात या पक्षाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. सर्व काही पूर्वनियोजित होते, असाही आरोप त्यांनी केला.
राशिद पुढे म्हणाले की, जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी कलम ३७० हटवले, त्याच्या ३ दिवसांआधी त्यांनी फारुख अब्दुल्ला यांची भेट घेतली होती. तेव्हा अब्दुल्ला म्हणाले होते की, काहीही होणार नाही; परंतु प्रत्यक्षात हे कलम हटवण्यात आले. यानंतर फारुख आणि ओमर या पिता-पुत्रांना ‘शासकीय विश्रामगृहा’त ठेवण्यात आले. हे दोघे जण केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी असल्यासारखे वाटते.
कोण आहेत इंजिनिअर राशिद ?
इंजिनिअर राशिद यांना वर्ष २०१६ मध्ये ‘अवैध कृत्य प्रतिबंध कायद्या’च्या अंतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना अर्थसाहाय्य केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. राशिद यांनी कारागृहातूनच मे २०२४ मध्ये झालेली लोकसभेची निवडणूक जिंकली. बारामुल्ला मतदारसंघातून त्यांनी जम्मू-काश्मीरचे नवनियुक्त मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा पराभव केला होता. १० सप्टेंबर २०२४ या दिवशी देहली न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन संमत केला.