(म्हणे) ‘हिंदु धर्मात सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नसल्याने मी समतेसाठी बौद्ध धर्म स्वीकारतो !’ – काँग्रेस सरकारचे मंत्री महादेवप्पा

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे मंत्री महादेवप्पा यांची घोषणा

समाजकल्याण मंत्री डॉ. एच्.सी. महादेवप्पा

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकचे समाजकल्याण मंत्री डॉ. एच्.सी. महादेवप्पा यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याची घोषणा केली. १४ ऑक्टोबरला धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त महादेवप्पा यांनी ‘एक्स’वर शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, मला स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाचा संदेश देणारा धर्म आवडतो. समानता आणि स्वातंत्र्य फार महत्त्वाचे आहे; पण माझ्या अनुभवानुसार जातीच्या वर्चस्वाच्या आजाराने ग्रासलेल्या हिंदु धर्मात सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नाहीत (जर काही आजार असेल, तर तो धर्मात नाही, तर त्या धर्माचे आचरण करणार्‍यांमध्ये असेल, हेही न कळणार्‍यांना मंत्री बनवले जाते ! – संपादक); म्हणून मी समता आणि शांतता यांचे प्रतीक असलेला बौद्ध धर्म स्वीकारणार आहे.

महादेवप्पा पुढे म्हणाले की, प्रत्येकाने भारताचा मूळ धर्म असलेल्या बौद्ध धर्माचा प्रचार करावा, अशी माझी इच्छा आहे. (भारताचा मूळ धर्म सनातन धर्म, म्हणजे हिंदु धर्म आहे, हे जगाला ठाऊक आहे; मात्र महादेवप्पा जाणीवपूर्वक अपप्रचार करत आहेत ! – संपादक)

संपादकीय भूमिका

बौद्ध धर्माची स्थापना झाली, तेव्हा तो शांतीचा प्रतीक होता; मात्र आता त्याचे अनुयायी असणारे देश, उदा. चीन, उत्तर कोरिया, म्यानमार येथे प्रचंड हिंसा आणि आक्रमकता दिसत आहे. याविषयी महादेवप्पा का बोलत नाहीत ? हिंदू कधी आक्रमक होत नाहीत, तसेच कुणा अन्य धर्मियांवर आक्रमणही करत नाहीत !