ख्रिस्ती मिशनर्‍यांचा धर्मांतराचा ‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ हा वादग्रस्त कार्यक्रम रहित !

हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटना यांच्या प्रयत्नांचे यश !

मुंबई – पाद्री बसिंदर सिंह यांचा १२ मे या दिवशी वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे होणारा ‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ हा धर्मांतराचा आणि अंधश्रद्धा पसरवणारा वादग्रस्त कार्यक्रम रहित करण्यात आला. विविध हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटना यांनी या कार्यक्रमाच्या विरोधात पोलीस ठाणे आणि मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यांच्याकडे तक्रारी प्रविष्ट केल्या होत्या.

या कार्यक्रमामध्ये ‘विविध विकार आणि विकलांगता’ दूर करण्याचे चमत्कार करण्यात येणार असल्याचे कार्यक्रमाच्या विज्ञापनातून सांगण्यात येत होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांकडून कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हिंदी चित्रपटसृष्टीतील काही नामवंत कलाकार उपस्थित रहाणार असल्याचे सांगण्यात येत होते. या कार्यक्रमात गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब आदी राज्यांतील लोक सहभागी होणार होते.

‘सॅफ्रॉन थिंक टँक’चे संस्थापक सिद्धांत मोहिते यांची पोलीस ठाण्यात तक्रार !

‘सॅफ्रॉन थिंक टँक’चे संस्थापक श्री. सिद्धांत मोहिते यांनी या कार्यक्रमाच्या विरोधात बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. पाद्री बजिंदर सिंह याच्यावर हत्येचा खटला चालवण्यात आला होता. प्रार्थना, तेल आदींच्या साहाय्याने लोकांचे आजार बरे करण्याचा दावा त्याने केला आहे. वर्ष २०१७ मध्ये बजिंदर याने परदेशात नेणार असल्याचे आमीष दाखवून एका युवतीला गंदीगड येथील स्वत:च्या निवासस्थानी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ बनवला होता. या प्रकरणी बजिंदर सिंह याच्यावर खटला चालू आहे.

वर्ष २०२१ मध्ये राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने चंदीगडच्या उपायुक्तांना पत्र लिहून कार्यक्रमात ‘धर्मांतरासाठी बळजोरीने एका अल्पवयीन मुलाचा उपयोग केला. त्यामुळे या प्रकरणी बाल न्याय कायद्याच्या अंतर्गत कारवाई करावी’, अशी मागणी केली होती. बजिंदर सिंह यांच्याविरुद्धच्या तक्रारी आणि घटना पहाता शारीरिक अन् मानसिक समस्या बरे करण्याच्या बहाण्याने अन्य धर्मियांना प्रभावित करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी श्री. मोहिते यांनी तक्रारीमध्ये केली होती. (ख्रिस्ती धर्मांतराविषयी जागरूकपणे सनदशीर मार्गाने विरोध करणार्‍या ‘सॅफ्रॉन थिंक टँक’चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे अभिनंदन ! – संपादक)