केरळमधील संघ नेत्याच्या हत्येप्रकरणी सरकारी अधिकारी बी. जिशाद यास अटक !

गेल्या १४ वर्षांपासून ‘पी.एफ्.आय.’मध्ये सक्रीय असल्याचे उघड !

मध्यभागी आरोपी बी. जिशाद

पलक्कड (केरळ) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते एस्. के. श्रीनिवासन् यांच्या हत्येच्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाने बी. जिशाद नावाच्या अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या सरकारी अधिकार्‍याला अटक केली. जिशाद हा नोव्हेंबर २०२१ मध्ये झालेल्या संघ कार्यकर्ते एस्. संजीत यांच्या हत्येतही सहभागी होता, अशी माहिती पथकाने दिली आहे. जिशाद हा वर्ष २००८ पासून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या जिहादी संघटनेमध्ये सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यरत असल्याचेही उघड झाले आहे. गेल्या मासात झालेल्या श्रीनिवासन् यांच्या हत्येच्या प्रकरणी ही २२ वी अटक आहे. सर्व आरोपी हे पी.एफ्.आय.शी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, जिशाद याने श्रीनिवासन् यांच्या हत्येच्या दिवशी त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले होते. नोव्हेंबर मासात संजीत यांच्या हत्येच्या वेळीही त्यांनी अशीच भूमिका वठवली होती. अग्निशमन विभागाने जिशाद याला तात्काळ निलंबित केले आहे.

पोलीस-प्रशासनात ‘पी.एफ्.आय.’च्या कार्यकर्त्यांचा भरणा !

गतवर्षी गुप्तचर विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार ‘पी.एफ्.आय.’चे अनेक कार्यकर्ते हे केरळ राज्य पोलीस आणि अन्य दलांमध्ये नोकरी करत आहेत. फेब्रुवारी २०२१ मध्ये पोलिसांनी पोलीस अधिकारी पी.के. अनस यांना निलंबित केले होते. अनस यांनी इडुक्की आणि कोट्टायम् जिल्ह्यांमध्ये कार्यरत रा.स्व. संघाच्या २०० स्वयंसेवकांची वैयक्तिक माहिती ‘पी.एफ्.आय.’ला पुरवली होती.

संपादकीय भूमिका

  • ‘मुसलमानांच्या मुख्य प्रवाहात आणल्यास त्यांच्या वृत्तीमध्ये पालट होईल’, असे म्हणणारा धर्मनिरपेक्षतावादी चमू आता गप्प का ?
  • ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्यासाठी कोणतेच सरकार काहीच करत नसल्याने आता राष्ट्रहितासाठी जनतेनेच वैध मार्गाने राष्ट्रव्यापी आंदोलने करून सरकारला तिच्यावर बंदी घालण्यास भाग पाडले पाहिजे !