हिंदूंच्या सहिष्णुतेची पोचपावती !

हिंदूंना असहिष्णु ठरवण्याच्या सध्याच्या स्पर्धेच्या काळात केरळ उच्च न्यायालयाने एका खटल्याचा निकाल देतांना केलेले विधान ही हिंदूंच्या सहिष्णुतेची पोचपावती म्हणावी लागेल. ‘ज्या लोकांना वाटते की, पाकिस्तान त्यांच्यासाठी योग्य जागा आहे, त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की, भारतात मुसलमानांच्या विरोधात कधीही चुकीचे घडलेले नाही’, असे विधान केरळ उच्च न्यायालयाने केले. आज कुठला समाज हिंस्र आणि दंगलखोर आहे, हे सर्वज्ञात आहे. आतंकवाद्यांचा ‘धर्म’ही सर्वांना ठाऊक आहे. तरीही कुठल्यातरी फुटकळ घटनांचा संदर्भ देत हिंदूंना असहिष्णु ठरवण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते. त्यासाठी स्थानिक ते अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक पुरोगामी टोळीच कार्यरत असते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही फुटकळ संस्था भारतात अल्पसंख्यांकांच्या मानवाधिकारांचे हनन होत असल्याचे अहवाल अधून-मधून प्रकाशित करत असतात. यातून त्यांना भारत आणि हिंदू यांची अपकीर्ती करायची असते. दुर्दैवाने आपल्याकडील प्रसारमाध्यमे त्यांच्या सुरात सूर मिसळतात. विदेशी संस्थांच्या आरोपांची शहानिशा करण्याचे कष्ट न घेता ही मंडळी भारताच्या अपकीर्तीला हातभार लावत असतात. अशांना काँग्रेसी, पुरो(अधो)गामी, साम्यवादी आदींचा ‘अर्थ’पूर्ण पाठिंबा असतो. आता या सर्व मंडळींची तोंडे केरळ उच्च न्यायालयाने एका फटक्यात बंद करून भारताच्या सहिष्णुतेवर मोहोर उमटवली आहे. आता आवश्यकता आहे ती भारताची अपकीर्ती करण्यासाठी कार्यरत असलेल्या साखळीचा भांडाफोड करण्याची आणि त्यांना दंडित करण्याची !