२ गटांतील हाणामारीत १ हिंदु तरुण घायाळ !
अमरावती – येथे आंतरधर्मीय विवाहासाठी आलेल्या जोडप्याला काही लोकांनी विरोध केला. ही घटना अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे घडली. येथील पोलीस ठाण्यासमोर २ गटांत झालेल्या हाणामारीत १ हिंदु युवक घायाळ झाला आहे. (पोलीस ठाण्याच्या समोर हाणामारी होतेच कशी ? १ हिंदु युवक घायाळ होईपर्यंत पोलीस काय करत होते ? – संपादक) मुलगी मुसलमान धर्मीय असल्याने २०० ते ३०० मुसलमानांनी गावात येऊन तिच्यावर दबाव आणला.
१. चांदूरबाजार तालुक्यातील दहिगाव पूर्णा येथील युवक मुंबई येथील विरारमधील एका आस्थापनात नोकरी करत होता.
२. तिथे त्याची ओळख तेथेच रहाणाऱ्या आणि त्याच आस्थापनात काम करणाऱ्या मुसलमान धर्मीय २० वर्षीय मुलीसमवेत झाली. काही काळाने दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला; मात्र मुलगा मुसलमान नसल्याने मुलीच्या आई-वडिलांनी विवाहाला विरोध दर्शवला. विरोध झुगारून दोघेही पांढरी (खानमपूर) येथील मुलाच्या मावशीकडे आले.
३. याविषयी मुलीकडच्यांना समजल्यानंतर २०० ते ३०० मुसलमान पांढरी गावात जमले. त्यांनी मुलीवर दबाव आणला; मात्र मुलगी तिच्या निर्णयावर ठाम असल्याने तिच्यावर दबावाचा कोणताही परिणाम झाला नाही.
४. तणाव वाढत असल्याने मुलाच्या नातेवाइकांनी अंजनगाव सुर्जी पोलिसांना भ्रमणभाष करून कळवले. पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पांढरी गाठून दोघांनाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले.
५. त्या वेळी दोन्ही गटांत वाद निर्माण झाला. त्यात काही युवकांमध्ये हाणामारी झाली. त्यात पंकज रायबोले हा युवक घायाळ झाला.