राज ठाकरे यांच्या विरोधात शिराळा (जिल्हा सांगली) प्रथमवर्ग न्यायालयाचा अटक वॉरंट !

मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सांगली येथील शिराळा प्रथमवर्ग न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढला आहे. ६ एप्रिल या दिवशी हे वॉरंट काढण्यात आले होते; मात्र त्यावर पोलिसांकडून अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.

सर्वोच्च न्यायालयाने ५ ते १० वर्षांपूर्वीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार प्रकरण निकाली काढण्यासाठी हे ‘वॉरंट’ काढण्यात आले असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. वर्ष २००८ मध्ये रेल्वे भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी मनसेने आंदोलन केले होते. त्या वेळी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. राज ठाकरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंद पुकारला. या वेळी दुकाने बंद करण्यासाठी बळजोरी केल्याच्या प्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. पोलिसांनी राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या १० कार्यकर्त्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट केले होते.