|
संभाजीनगर, २ मे (वार्ता.) – महाराष्ट्रात मला दंगली घडवायच्या नाहीत, तशी माझी इच्छाही नाही; पण ३ मे नंतर महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे न काढल्यास ४ मेपासून मशिदींसमोर ध्वनीक्षेपकावरून दुप्पट आवाजात ‘हनुमान चालिसा’ लावली जाईलच. महाराष्ट्रातील तमाम हिंदूंना ही विनंती आहे. ध्वनीक्षेपक हा सामाजिक विषय आहे. तुम्ही धार्मिक रंग देणार असाल, तर त्याला धर्मानेच उत्तर द्यावे लागेल. उत्तरप्रदेशात ध्वनीक्षेपक उतरवले जाऊ शकतात, तर महाराष्ट्रात का उतरवले जाऊ शकत नाहीत ?, असा घणाघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे १ मे या दिवशी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘हिंदु’ शब्दाची ‘अलर्जी’ आहे. केवळ सत्तेसाठी, आमदार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १०-१५ वर्षे महाराष्ट्रातील जातीजातींत विष कालवले. १८ पगड जातींना घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पवार यांनी केवळ मतांसाठी विष कालवले. आमदार निवडून येण्यासाठी हे राजकारण चालू केले, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. पूर्ण महाराष्ट्रातही सभा घेणार असल्याचे त्यांनी या वेळी घोषित केले.
विशेष१. सभेमध्ये काहींनी हुल्लडबाजी केली असता ‘कुणी टाळकी आली असतील, तर त्यांना हाणा’, असे म्हणून ‘त्यांचा चौरंगा करायलाही कमी करणार नाही’, असे ते म्हणाले. २. सभेच्या वेळी अजानचा आवाज चालू झाल्यावर त्यांनी पोलिसांना त्यांनी आवाज न्यून करण्याचे आवाहन केले. अन्यथा काही झाल्यास मी उत्तरदायी नसेन, असे त्यांनी या वेळी सांगितले. |
राज ठाकरे यांनी या वेळी मांडलेली अन्य सूत्रे
१. महाराष्ट्रातील अनेक मशिदींवर अनधिकृत ध्वनीक्षेपक आहेत. कुणाकडेही अनुमती नाही. संभाजीनगर येथे ६०० मशिदी आहेत. बांगेची ‘कॉन्सर्ट’ (स्पर्धा) चालते का ? सगळ्यांना समान नियम असला पाहिजे. रस्त्यावर येऊन नमाज पढण्याचा मुसलमानांना कुणी अधिकार दिला ?
२. छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर औरंगजेब २७ वर्षे महाराष्ट्रात राहिला. अनेक जण त्याच्याशी लढले. त्यामुळे औरंगजेबाने एका पत्रात म्हटले ‘शिवाजी अजून मला छळतो.’ तो जाणून होता शिवाजी हा ‘विचार’ आहे, तो विचार संपवला पाहिजे आणि तेच झाले. आज सगळा इतिहास आम्ही विसरलो. आम्ही केवळ महापुरुषांच्या पुण्यतिथी आणि जयंती साजर्या करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य आहे की, आमच्या लोकांच्या अंगात देवी आणि भुते येतात. जेव्हा आमच्या अंगात शिवाजी नावाचे भूत येईल, तेव्हा जग पादाक्रांत करू. आमच्या अंगात ‘शिवाजी’ आला पाहिजे.
३. अल्लाउद्दीन खिलजी आला. येथे फितुरी झाली. आमच्या महाराष्ट्राची कन्या खिलजीने पळवून नेली. पुढची ४०० वर्षे महाराष्ट्र खितपत होता. माता-भगिनींवर अत्याचार आणि बलात्कार होत होते. पैठण येथे संत एकनाथ महाराजांनी आरोळी ठोकली ‘दार उघड बये दार उघड’ आणि वर्ष १६३० मध्ये दार उघडले आणि शिवरायांचा जन्म झाला. स्वाभिमानाने कसे जगायचे, हे आमच्या महाराजांनी शिकवले. महाराज गेले. आपण इतिहास कधी समजूनच घेतला नाही.
(सौजन्य : Mumbai Tak)
४. केंद्र सरकारमध्ये तुमच (काँग्रेसचे) सरकार होते, मग का जेम्स लेनला फरफटत का आणले नाही ? समर्थ रामदासस्वामी यांच्यावर तुम्ही ब्राह्मण म्हणून टीका करणार का ? कशाला जातीवरून माथी भडकवता ? समर्थ रामदास स्वामी यांनी शिवरायांवर ज्या शब्दांत लिहिले आहे, तसे अजून कुणी लिहिले नाही.
५. प्रबोधनकार हिंदु धर्म मानणारा आणि पूजा करणारा माणूस होता. ते भट-भिक्षुकीच्या विरोधात होते; पण देव मानणारे होते. त्यांनी ख्रिस्ती मिशनरींविरुद्ध संघटना त्यांनी स्थापन केली. नवरात्रोत्सव सार्वजनिक केला.
६. रायगडाची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली, मग त्यांना ब्राह्मण म्हणणार का ? त्यांनी पहिले वर्तमानपत्र काढले त्यांचे नाव ‘मराठा’ होते, हे पवार का सांगत नाहीत ? लेखक जेम्स लेन हे दिवंगत शिवशाहीर पुरंदरे यांना भेटलेच नव्हते, असे त्यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखातीत सांगितले आहे. हे शरद पवार का सांगत नाहीत ? मग कशाला तुम्ही महाराष्ट्राची माथी भडकावली ? त्याच्यावरून तुम्ही १०-१५ वर्षे राजकरण केले. मी शरद पवार यांना नास्तिक म्हटल्यावर देवासमवेत छायाचित्रे काढायला लागले. शरद पवार यांच्या कन्या खासदार सौ. सुप्रिया सुळे संसदेत म्हणाल्या होत्या की, शरद पवार नास्तिक आहेत.